कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत ७०व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत शोभायात्रा संचलनाचे आयोजन येथील महात्मा गांधी मैदान येथे करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या शोभायात्रा स्पर्धेत वीर कक्कय विद्यामंदिराने प्रथम क्रमांक पटकावला.शोभायात्रा संचलनात समाजातील ज्वलंत समस्यांचा अंतर्भाव होता. महापालिकेच्या सहा शाळांनी यामध्ये सहभाग घेतला व प्रत्येक शाळेने वेगवेगळ्या विषयांवर अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केले. संबंधित शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांनी चपखल वेशभूषा, संदेश फलक, प्रतिकृती, नकाशे इत्यादींचा वापर करून संचलनास एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी या शाळेने ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर संचलन करताना व्यसनांमुळे होणारी हानी, आजार, त्यांचे दुष्परिणाम, कुटुंबाची होणारी वाताहत यांवर प्रकाश टाकून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. टेंबलाईवाडी विद्यालय या शाळेमार्फत समाजातील चंगळवादी वृत्तीचा पर्दाफाश करण्यात आला.
महापलिकेचे राजे छत्रपती संभाजी विद्यालय, या शाळेने स्वच्छता' या विषयावर संचलन केले. फुले विद्यालय, फुलेवाडी या शाळेने ‘आजचा सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न - पर्यावरण’ या विषयावर शोभायात्रेत संचलन केले. ल. कृ. जरग विद्यालय या शाळेने ‘देशाची संरक्षण व्यवस्था’ हा विषय निवडून त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
वीर कक्कय विद्यालय या शाळेने ‘गडकिल्ले - आमचा अभिमान’ हा विषय घेऊन त्याचे दिलखेचक सादरीकरण केले. मावळ्यांचे शौर्य, प्रमुख ऐतिहासिक घटना यांचा आढावा घेत व कसदार अभिनय, शस्त्रसंचलन यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना इतिहासाची झलक दाखवली.
प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची सामूहिक शपथ दिली. यावेळी, प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती श्रावण फडतारे, सदस्य विजयसिंह खाडे-पाटील, ‘समग्र शिक्षा’चे कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील उपस्थित होते.