आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : ‘पांढरा कुर्ता, शेला, पिवळे फेटे आणि बर्ची नृत्यांसह मल्लखांब, मर्दानी खेळ अशा उत्साही व जल्लोषी वातावरणात शोभायात्रेने मंगळवारी रंगत आली.
यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त दुसऱ्या दिवशी करवीर गर्जना या ढोलपथकाने शोभायात्रा काढली. सकाळी मिरजकर तिकटी येथून महापौर हसिना फरास यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती आणि चित्ररथ या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले होते.
मराठी संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा जपत मर्दानी खेळ, मल्लखांब, चित्ररथ, ढोलपथक, ध्वजपथक संचलन करत ही शोभायात्रा मार्गस्थ झाली. पारंपारिक वेषात बालचमुचांही यामध्ये सहभाग होता. विशेष म्हणजे या शोभायात्रेत युवतींची संख्या मोठया प्र्रमाणात होती. मल्लंखाब आणि मर्दानी खेळाने तर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
बिनखांबी गणेश मंदिर चौकात यानिमित्त आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.बर्ची नृत्यामध्ये युवक-युवतींनी सांस्कृतिक वारसार जपत नृत्यविष्कार सादर केला. महाद्वार रोड, गुजरी कॉर्नरमार्गे भवानी मंडप येथे शोभायात्रेची सांगता झाली.यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शोभायात्रेत अध्यक्ष जितेंद्र कदम, उपाध्यक्ष युवराज जोशी, सेक्रेटरी ऋतुराज जोशी, रेवती जरग, अमृत चव्हाण, दुर्गेश पोतदार, अंकुश कुलकर्णी, करण पाटील, निखिल गावडे, विक्रम घोरपडे आदींचा सहभाग होता.