बोरवडे : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, कित्येक महिन्यांपासून शेतीपंप वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, मंजूर वीजभारपेक्षा मनमानी ज्यादा वाढविलेला वीजभार, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकमद अव्वाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. यामुळे कागल तालुक्यातील सोनाळीसह परिसरातील ग्राहक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मीटरचा फोटो घेऊन रीडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत. पंपास मीटर रीडिंग अनिवार्य असूनही अंदाजे बिल देण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये वीज वापर नसतानाही काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठविले जात आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रारीही केल्या, मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेच्या बिलामुळे ग्राहकांत संतापाची लाट पसरली आहे. मंजूर वीजभारात महावितरणने परस्पर बिलावर वीजभार वाढविला जात आहे. वास्तविक हा बदल करताना कृषीपंपाची स्थळ तपासणी करायला हवी होती. त्यानंतर स्थळ तपासणीचा अहवाल तयार करावयाचा असतो; मात्र प्रत्यक्षात स्थळ तपासणी न करता कार्यालयातच बसून आपल्याला जसे वाटते तसे अंदाजे वीजभार वाढविण्याचा अजब कारभाराचा नमुना महावितरणने दाखविला आहे. काही बिलांवर तर रीडिंग वेगळे, फोटो दुसरा, तर बिल तिसऱ्याचेच पाठविले जात आहे. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरच्या या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, ते ग्राहक न्यायालयाकडे धाव घेणार आहेत. महावितरणच्या या गलथान व मनमानीला येथील जनता वैतगली असून महावितरणमध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभार कधी येणार? असा प्रश्न ग्राहकांमधून विचारला जात आहे. याबाबत मुरगूड कार्यालयाचे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बिलविभागाकडे विचारणा करण्यास सांगितले. (वार्ताहर)आमच्या शेतीपंपाचा ०५ एच. पी. मंजूर वीजभार आहे. मात्र, विद्युत वितरण कंपनीने परस्पर ०७ एच. पी. असा वीजभार बिलावरती वाढवलेला आहे. पावसाळ्यामध्ये वीजवापर नसतानाही बिलावरती २१०० युनिट विजेची नोंद आहे. अद्याप बिलावरती कधीही मीटर रीडिंगचा फोटो आलेला नाही. याबाबत लेखी तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. - समाधान म्हातुगडे, ग्राहक, सोनाळीअनेकदा वीज कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे ग्राहकांनी लेखी तक्रार करावी. तिथे दखल न घेतल्यास ग्राहक न्यायालयाकडे दाद मागावी. - कादंबरी प्रल्हाद भोंडे, संचालिका, अखिल भारतीय ग्राहक प्रबोधिनी न्यायमंच महाराष्ट्र राज्य
‘महावितरण’चा शेतीपंपधारकांना शॉक
By admin | Published: April 10, 2017 11:46 PM