अतुल आंबी ।इचलकरंजी : महावितरणने मागील नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर दरवाढ लादली आहे. मात्र, अन्य उद्योगांच्या तुलनेत यंत्रमागधारकांची परिस्थिती नाजूक बनली असल्याने त्यांच्यासाठी ही वाढ म्हणजेच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. त्यातच पॉवर फॅक्टर पेनल्टीची रक्कमही लावल्याने २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना दुहेरी ‘शॉक’ लागला आहे.
तारेवरची कसरत करीत यंत्रमागधारक धडपडत आहेत. तरीही शासनाकडून त्यांना कोणतीच मदत उपलब्ध होताना दिसत नाही. याउलट या महिन्यात २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांच्या वीज बिलात प्रतियुनिट ३० ते ३५ पैशांची वाढ, तर २७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांच्या वीज बिलात ५० ते ५५ पैशांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे यंत्रमाग उद्योजकांची आर्थिक गणिते विस्कटत चालली आहेत. उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीच्या तुलनेत विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याचे चित्र आहे. तसेच नुकताच दिवाळी सण पार पडला असून, त्यासाठी मोठी उलाढाल करीत यंत्रमागधारकांना आपल्या कामगारांना दिवाळी बोनस द्यावा लागला आहे.
येथील यंत्रमागधारकांचा व्यवहार हा दिवाळी ते दिवाळी असा असतो. दिवाळीनंतर नव्याने सुरू होणाºया व्यवसायाची स्वप्ने पाहणाºया यंत्रमागधारकांना वीज बिल वाढीचा पहिलाच फटका बसला आहे. २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना मार्च २०१८ महिन्यात तीन रुपये ५३ पैसे असलेले वीज बिल जूनमध्ये तीन रुपये १३ पैशांपर्यंत खाली आले होते. आता ते वाढून चार रुपये नऊ पैशांपर्यंत पोहोचले आहे, तर २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना तीन रुपये ३० पैसे ते तीन रुपये ३५ पैसे असलेले वीज बिल आता वाढून तीन रुपये ८५ पैसे ते तीन रुपये ९० पैशांपर्यंत पोहोचले आहे. त्यातच त्यांना पॉवर फॅक्टर पेनल्टी लावल्याने दुहेरी ‘शॉक’ बसला आहे.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने घोषणा केल्याप्रमाणे यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत लागू करावी. तसेच अन्य योजना राबवून वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी द्यावी; अन्यथा हा उद्योग कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.पॉवर फॅक्टर पेनल्टीचा फंडापॉवर फॅक्टर पेनल्टी म्हणजे २७ अश्वशक्तीवर वापर असणाºया यंत्रमागधारकांचा पॉवर फॅक्टर (वीज वापराचे नियोजन) लो (कमी) झाल्यास त्याला वीज बिलात पेनल्टी (दंड) आकारला जातो. वेलमेंटेन (वीज वापराचे जेमतेम नियोजन) असणाºयांना पेनल्टी अथवा सवलत दोन्हीही लावले जात नाही. तर वेलमेंटेन (चांगले नियोजन) असणाºयांना इन्सेंटीव्ह (अधिकचा लाभ) दिला जातो. डीओडी मीटरचा वापर करणाºयांना रात्रीच्या वीज वापरावर अधिक सवलत मिळते.
सरकारने एक रुपयाची वीज बिलात सवलतची घोषणा करून दोन वर्षे उलटली तरी आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. उलट वीज बिलात वारंवार वाढ केली जात आहे. त्यामुळे या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येईना झालेत. सरकारने घोषणा केलेली एक रुपयाची सवलत व सध्या वाढविलेली प्रतियुनिटची रक्कम कमी करण्याचा निर्णय घ्यावा.- सतीश कोष्टी, अध्यक्ष, पॉवरलूम असोसिएशनसध्या सत्ताधारी असणारे जेव्हा विरोधक होते, तेव्हा ते वीज बिल कमी करण्यासाठी यंत्रमागधारकांसोबत लढत होते. आता ते सत्ताधारी बनले आणि त्यावेळी सत्ताधारी असणारे विरोधक बनून यंत्रमागधारकांसोबत आता त्याच मागणीसाठी लढत आहेत. म्हणजेच सत्ताधारी कोणीही असले तरी यंत्रमागधारकांचा राजकारण म्हणून वापर केला जातो.- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटनासरकारकडून मिळणारी पोकळ व खोटी आश्वासने देण्याचा हा प्रकार पाहता आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन चळवळ उभारावी. त्याशिवाय सरकार लक्ष देणार नाही. तसेच पॉवर फॅक्टर पेनल्टी लागलेल्या यंत्रमागधारकांनी हजारोंच्या संख्येने वैयक्तिक तक्रारी दाखल कराव्यात. त्याशिवाय दखल घेतली जाणार नाही. - प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ