कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:23 PM2023-09-06T12:23:46+5:302023-09-06T12:26:46+5:30
चोपडे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून तर अमित गाताडे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड
इचलकरंजी : शहरातील राष्ट्रवादीला खिंडार पडले असून, नगरपालिकेचे माजी सभापती विठ्ठल चोपडे यांनी महिला आघाडी शहर अध्यक्षांसह चार माजी नगरसेवकांना सोबत घेऊन मंगळवारी अजित पवार गटात सहभागी झाले. मुंबईत झालेल्या प्रवेशानंतर चोपडे यांची इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून तर अमित गाताडे यांची शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील राष्ट्रवादीत जांभळे-कारंडे असे दोन गट आहेत. स्थानिक निवडणुकीत अनेक वेळा हे दोन गट वेगवेगळी भूमिका घेत होते. गतवर्षी हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यात समेट घडवून इचलकरंजी राष्ट्रवादी एकसंध केली. त्यानंतर शरद पवारांपासून फुटून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यावेळी इचलकरंजी राष्ट्रवादी एकसंध असल्याचे सांगत विठ्ठल चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते.
दरम्यान, शहराचा पाणीप्रश्न व अन्य राजकीय घडामोडींनंतर चोपडे यांनी निर्णय बदलत अजित पवार गटात सहभागी होण्याचे ठरवले. त्यानुसार मंगळवारी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा माधुरी चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे, दत्ता देडे, आबा निडंगरे यांच्यासह गाताडे, बाळासाहेब देशमुख, गणेश माच्छरे, निहाल कलावंत, सुभाष मालपाणी, सलीम ढालाईत, उत्कर्ष सूर्यवंशी, दिलावर पटेल, लखन बेनाडे, अथर्व जाधव, अमोल मद्यापगोळ, राजू रावळ, प्रकाश जगताप, प्रमोद दाडमोडे, राजू आरगे, सुनील बोणे, राहुल कांबळे, रज्जाक शेख, प्रसाद तांबे, नंदकुमार टेके आदी उपस्थित होते.
शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस बळकट करण्यासाठी कार्यरत राहा. संघर्ष करावा लागला तरी डगमगू नका. शहराला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहीन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला दिला आहे. त्यानुसार आमची पुढील रुपरेषा लवकरच आखली जाणार आहे. आमच्यासोबत आणखीन काही प्रमुख पदाधिकारीही लवकरच प्रवेश करणार आहेत. - विठ्ठल चोपडे