गडहिंग्लज : सुट्टीवर आलेल्या जवानाने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.शिवानंद मल्लाप्पा आरबोळे ( वय २३,रा.तनवडी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, शिवानंद हा दहावीनंतर सैन्य दलात भरती झाला होता.सध्या मेघालयमध्ये कार्यरत होता.बदली झाल्यामुळे तो सुट्टीवर गावी आला होता.सुट्टी संपल्यानंतर तो राजस्थान येथे कर्तव्यावर हजर होणार होता. रविवारी (९) सकाळी आई, वडीलांच्या सोबत तो शेताला गेला होता. तिथेच जेवण करून अंघोळीसाठी दुपारी तो घरी आला होता.दरम्यान,घराच्या पाठीमागील जनावरांच्या गोठ्याचे दार आतून बंद करून गोठयातील वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. बराचवेळ तो बाहेर न आल्यामुळे आज्जीने आरडाओरडा केला.त्यामुळे नातेवाईक व आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.त्याच्या पश्चात आई- वडील,भाऊ,भावजय असा परिवार आहे.त्याचे जेष्ठ बंधू दर्शन हेही सैन्यातच असून तेही सुट्टीवर गावी आले आहेत.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
कुटुंबियांना धक्का!
शिवानंद हा अविवाहित होता. दोनाचे चार हात व्हावेत म्हणून त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू होते.परंतु,त्यांने अचानकपणे अकालीच जगाचा निरोप घेतला.त्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.