रमेश सुतार
बुबनाळ : जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीची प्रचिती शिरोळ तालुक्यातल्या औरवाडमधील गोपाळ सिद्धाम जंगम यांच्या शिरोळ दत्त साखर कारखान्यातील अपघाती मृत्युमुळे आली आहे. औरवाड नृसिंहवाडी परिसरात दर सोमवारी न चुकता बेलाची पाने वाटणाऱ्या या शिवभक्ताला मरणसुद्धा सोमवारीच आल्याने हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची की बेलाची पाने तुझ्या भक्तांना वाटणाऱ्या गोपाळची? अशा प्रश्नातून औरवाड, नृसिंहवाडीसह परिसर सुन्न झाला आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रभागी असणाऱ्या गोपाळचा मृत्यू सर्वांना अनपेक्षित व तितकाच धक्कादायक आहे.
दिसायला तसा राजबिंडा गडी, उंची लहान असली तरी शरीर बलदंड. समोरच्या व्यक्तीला जिव्हाळ्याच्या आपुलकीपूर्ण शब्दांनी आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व होते गोपाळ जंगमचे. सोमवारी नेहमीप्रमाणे दत्त साखर कारखान्यात गोपाळ कामावर गेला; पण येताना परत आले ते केवळ त्याचे मृत शरीर. पाणी शुद्धीकरण केंद्रात श्वास गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला त्यात औरवाड येथील गोपाळसुद्धा होता. गोपाळचे कारखान्यावर अपघाती निधन झाल्याची बातमी वणव्यासारखी सर्वत्र पसरल्यावर कारखाना स्थळावर औरवाड व स्थानिक परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या गोपाळचा मृत्यू अनेकांना न पटणारा होता. पण झालेली घटना नाकारणार कोण? रुग्णालयात नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवारांनी केलेला आक्रोश, फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
२००५, २००६ आणि २०१९ च्या महापुरात औरवाड नृसिंहवाडी परिसरातील शेकडो ग्रामस्थांना नावाडी अरुण गावडे यांच्या नावेतून सुरक्षित स्थळी पोहोचविण्याच्या मदतकार्यात गोपाळ अग्रस्थानी होता. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर महापुरात आतडीला पीळ देऊन नावेचे वल्हे मारणारा गोपाळ दिसत होता. महादेवाचा परम भक्त असणारा गोपाळ दर सोमवारी नृसिंहवाडी, औरवाड परिसरात महादेवाला प्रिय असणारी बेलाची पाने घरोघरी जाऊन देत असे. तोच गोपाळ महादेवाचा वार सोमवारी देवाघरी गेल्याने औरवाड नृसिंहवाडीसह नदीपलीकडील सात गावात हळहळ व्यक्त होत आहे.