बुबनाळ : ‘जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला’ याचा प्रत्यय औरवाड, ता. शिरोळमधील गोपाळ जंगम यांच्या शिरोळ दत्त साखर कारखान्यावर अपघाती मृत्यूमुळे आला आहे. औरवाड नृसिंहवाडी परिसरात सोमवारी बेलाची पाने वाटत या शिवभक्तांचे मरणही सोमवारीच आल्याने हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची की बेलाची पाने तुझ्या भक्तांना देणाऱ्या गोपाळची का? गोपाळच्या मृत्यूने औरवाड, नृसिंहवाडीसह परिसर सुन्न झाला आहे.
सामाजिक कार्यात अगेसर असणाऱ्या गोपाळचा मृत्यू धक्का देणारा आहे.
दिसायला तसा राजबिंडा गडी, उंची लहान असली तरी शरीर बलदंड समोरच्या व्यक्तीला आपुलकीने आदराने आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व होते गोपाळ जंगमचे. सोमवारी नेहमीप्रमाणे शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यातून कामाला गेला; पण परत आले ते त्याचे मृत शरीरच. पाणी शुद्धीकरण केंद्रात श्वास गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्यातील एक होता औरवाड येथील गोपाळ जंगम. गोपाळचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यावर कारखाना स्थळावर औरवाड व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यात नेहमी अगेसर असणाऱ्या गोपाळचा मृत्यू अनेकांना न पटणारा होता; पण झालेली घटना नाकारणार कोण, रुग्णालयात नातेवाईक मित्रपरिवारांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
2005, 2006 आणि 2019 च्या महापुरात औरवाड नृसिंहवाडी परिसरातील शेकडो ग्रामस्थांना नावाडी अरुण गावडे यांच्या नावेतून सुरक्षित ठिकाणी पोहण्याच्या मोहिमेत गोपाळ अग्रभागी होता. अगदी आतड्यांना पीळ देऊन नावेचे वल्हे मारत अनेकांना जीवदान दिले. श्री महादेव भक्त असणारा गोपाळ दर सोमवारी नृसिंहवाडी, औरवाड परिसरात बेलाची पाने घरोघरी जाऊन देत होता. तोच गोपाळ महादेवांचा वार सोमवारी देवाघरी गेल्याने औरवाड नृसिंहवाडीसह नदीपलीकडील सात गावांत दुःखाचे डोंगर पसरले आहेत.