कोल्हापूर : मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार व तिचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत बुधवारी (दि. ७) रात्री पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. संबंधित विवाहितेने याबाबत फिर्याद दिली. ही घटना इचलकरंजी येथे मंगळवारी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पती पोपटराव आनंदराव इंगवले, डॉ. अभिजीत पोपटराव इंगवले (सावत्र मुलगा), प्रदीप माळी, शुभम इंगवले, सुरेश कचरे (सर्व रा. रामलिंग फाटा, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व अजय प्रकाश इंगळे (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात बुधवारी (दि. ७) रात्री करण्यात आली. या प्रकरणी एका संशयितास गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. संबंधित विवाहिता विधि सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्याकडे गेल्याने त्यांच्या माध्यमातून तिला न्याय मिळाला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी पीडित विवाहितेच्या मुलीस ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर इचलकरंजीतील मैत्रिणीच्या राहत्या घरी पीडित विवाहितेचा पती संशयित पोपटराव इंगवले, डॉ. अभिजित इंगवले, प्रदीप माळी, शुभम इंगवले, सुरेश कचरे यांनी संगनमत केले. त्यानंतर संशयित अजय इंगळे विवाहितेवर अत्याचार केला.संशयितांनी त्याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. ‘पोलिसात गेलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही’अशी धमकी संशयितांनी दिली.दरम्यान, पीडित विवाहितेने ही घटना जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्यासमोर बुधवारी कथन केली. विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी मार्गदर्शन करून तिला न्याय देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी अॅड. शुभांगी निंबाळकर व विधी स्वयंसेवक रघुनाथ पाटील यांनी तिला आयजीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तिथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पीडितेने फिर्याद दिली.
या प्रकरणी संशयितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास पोलीस निरीक्षक एम. बी. रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन. एन. सुळ करत आहेत.
प्रथम फिर्याद द्या; त्यानंतरच वैद्यकीय तपासणीसंबंधित पीडितने प्रथम पोलिसांत फिर्याद द्यावी, त्यानंतरच तिची वैद्यकीय तपासणी करावी, असे सीपीआरमध्ये बुधवारी सांगण्यात आले. त्यामुळे विधि सेवा प्राधिकरणाच्या अॅड. निंबाळकर, विधि स्वयंसेवक पाटील व पीडित विवाहिता आयजीएम रुग्णालयात गेले. त्याठिकाणी तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.