लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातून एका नॉटिग मशीनची चोरी झाली. हा चोरीचा प्रकार मध्यरात्री लक्षात येताच तक्रारदाराने मध्यरात्रीच शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले; परंतु त्यावेळी ठाणे अंमलदार चक्क खुर्ची बाजूला करून पोलीस ठाण्यातच ऑन ड्युटी झोपी गेले होते. तासाभराच्या प्रयत्नानंतर कच्ची तक्रार नोंदवून तक्रारदारास परत पाठविण्याचा संतापजनक प्रकार घडला.
जिल्ह्यातील पोलीस दलात सुधारणा करण्याबरोबरच अवैध व्यावसायिकांचा कडक बंदोबस्त करण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे; परंतु अशा गोष्टींमुळे पोलीस दलास बदनामीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ५ जानेवारी २०२१ ला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर येथील शुभम बाळू कवडे (वय २६) यांचे नोटिंग मशीन चोरीला गेले. ही बाब लक्षात येताच शुभम यांनी तत्काळ शिवाजीनागर पोलीस ठाणे गाठले. तेथे ड्युटीवर असणारे अंमलदार झोपी गेल्याचे दिसले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे बाजूच्या खोलीतून दुसऱ्या कॉन्स्टेबलला बोलावून आणून खटाटोपानंतर त्यांना जागे करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे तब्बल तासाभरानंतर त्यांची कच्ची तक्रार नोंद करून परत पाठविण्यात आले. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
(फोटो ओळी)
०७०१२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी ठाणे अंमलदार मध्यरात्रीच्या सुमारास झोपी गेले होते.
०७०१२०२१-आयसीएच-०५
खूप प्रयत्नांनंतर ठाणे अंमलदार उठून बसले.