कोल्हापूर : दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या शूटिंगला कोल्हापूर चित्रनगरीत प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लोकदैवतांचे अभ्यासक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे आणि कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुहूर्त पार पडला. या पौराणिक मालिकेसाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारण्यात आला आहे. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि पथक हे काम जवळपास दीड महिन्यापासून करीत आहे. यामध्ये ज्योतिबाचा महाल, अंबाबाईचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.
कोरोना काळातील सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत या मालिकेचे शूटिंग सुरू झाले आहे. या मालिकेसाठी देवस्थान समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
आपल्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहीत असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. हे करताना अनेक पोथ्यांचे दाखले घेण्यात आले आहेत. मालिकेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या उंचीवर नेतील, याची खात्री आहे.-महेश कोठारे, निर्माते