कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या ३ एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रेत दुपारी निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचा निर्णय जिल्हा व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पूर्ण यात्रेवर पोलिसांची नजर राहीलच, शिवाय काही अनुचित प्रकार घडत असेल तर तातडीने त्यावर उपाययोजना करणे सोयीचे जाणार आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जोतिबा डोंगरावरील पर्यटन विकास महामंडळ येथे जिल्हा-पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मानकरी, स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजाराम माने होते. यावेळी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, सरपंच रिया सांगळे, तहसीलदार प्रशांत पिसाळ, वाहतूक पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर व बा' परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यमाई मंदिर येथे चार कॅमेरे लावण्यात आले आहेत. दुपारनंतर देवाची पालखी निघते, त्यावेळी पालखी मार्गावर चार ठिकाणी कॅमेरे लावले जातील.त्या चित्रीकरणाचे थेट प्रक्षेपण पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील टीव्हीवर केले जाईल.
जोतिबाच्या ‘पालखी’चे होणार चित्रीकरण
By admin | Published: March 23, 2015 11:16 PM