कोल्हापूर : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर बंद झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. महापालिका प्रशासनाची पथकेही बाजारपेठेत प्रमुख ठिकाणी फिरून नियमाप्रमाणे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.शहर, जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारने अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर दुकाने उघड्यावर निर्बंध आणले होते. पण गेल्या आठवड्यात शहरातील व्यापारी, दुकानदार आक्रमक पवित्रा घेत दुकाने सुरू करण्याची भूमिका घेतली.
परिणामी ४ जुलैला रविवारी रात्री उशिरा सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने उघण्यास परवानगी दिली. अशीच परवानगी जिल्ह्यातील इतर शहरातील दुकानदारांनाही मिळावी, अशी मागणी विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी केली.
दरम्यान, कोल्हापूर शहरासाठी पाच दिवसाची दिलेली मुदत संपल्याने चार वाजता दुकाने बंद करण्यात आली. यामुळे शहरात सकाळच्या टप्यात झालेली गर्दी सायंकाळी कमी झाली. बिंदू चौक, महाव्दार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी दुकाने बंद होताच शुकशुकाट निर्माण झाला. महापालिका इस्टेट विभागाची पथके शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.