लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आवारातील पूजा साहित्याची दुकाने, स्टॉल यांनी केलेले वाढीव अतिक्रमण हटविण्याची सूचना मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. याशिवाय प्लास्टिकमुक्त नवरात्रौत्सव साजरा करताना भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दुसरीकडे, मुख्य दर्शन रांगेसाठी पूर्व दरवाजा येथे दर्शन मंडप उभारणी सुरू करण्यात आली.शारदीय नवरात्रौत्सवाला आता दहा दिवस उरले आहेत. त्यानिमित्त सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरामध्येही जय्यत तयारी सुरू असून मंदिराची स्वच्छता, शिखरांची रंगरंगोटी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष, खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्यासह समिती सदस्यांनी मंदिराच्या अंतर्बाह्य परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर आवारात प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय घेतला; तसेच दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत, भाविकांनी पिशव्या मागितल्यास नकार द्यावा. तसेच आवारातील अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही केल्या. मुखदर्शन, अन्नछत्र, दर्शनरांग यावर समिती सदस्यांनी चर्चा केली. येत्या आठवड्यात घेण्यात येणाºया बैठकीमध्ये अन्य प्रलंबित गोष्टींवर निर्णय घेण्याचे निश्चित केले.महाप्रसादसंयुक्त विद्यमानेअंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची सांगता पौर्णिमेच्या महाप्रसादाने होते. यासंबंधी गेल्या काही वर्षांपासून देवस्थान समिती व महालक्ष्मी भक्त मंडळामध्ये न्यायालयात दावा सुरू होता. न्यायालयाने भक्त मंडळ, देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन केले जावे, असा निर्णय दिला आहे.
अंबाबाई मंदिर दुकानदारांनी अतिक्रमण हटवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:06 AM