कोल्हापूर , दि. २१ : घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा उठावाचे काम करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्याला ३०० रुपये शुल्क आकारणी केली जाणार असल्याने त्याला शहरातील सलून दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारनंतर सलून दुकानदारांचे एक शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे. प्रत्येक महिन्याला ३०० रुपये शुल्क अवास्तव असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी दुकानदारांची मागणी आहे.
यासंदर्भात कोल्हापूर नाभिक दुकान मालक जनसेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत मांडरेकर यांनी सांगितले की, एकटी या संस्थेने आमच्या सभासदांना मासिक ३०० रुपये शुल्क देण्याबाबतची पत्रे दिली आहेत. वास्तविक आम्ही सर्व दुकानदार १५०० रुपयांच्या पुढे परवाना शुल्क भरतो.
नियमाप्रमाणे घरफाळा भरतो तरीही आता कचरा उचलण्याबाबतचे शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, तो अन्यायकारक आहे. आमची सर्वांची छोटी दुकाने आहेत. फार थोड्या दुकानांतून चार खुर्च्या असल्या तरी कारागीरांचा प्रश्न गंभीर असल्याने प्रत्यक्षात तेथे दोनच कारागीर काम करत असतात. त्यामुळे काम कमी आणि शुल्क जादा झाले आहे.
दैनंदिन रोजीरोटीवर आमचा उदरनिर्वाह चालतो. सध्या असलेली महागाई, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च, कर्जाचे हप्ते हा सगळा हिशेब केला तर महानगरपालिकेचे नव्याने आकारले जाणारे शुल्क परवडणारे नाही, त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा,अशीच आमची सर्वांची मागणी असल्याचे मांडरेकर यांनी सांगितले.
दिवाळी सण संपल्यानंतर संघाचे एक शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यावेळी ही नवीन कर मागे घेण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो, पण केवळ तोंडी चर्चा झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.