गांधीनगर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील जेम्स स्टोन्स या व्यापारी संकुलातील दुकानगाळे खरेदी देतो, असे सांगून व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा (रा. सिद्धिविनायक क्लासिक अपार्टमेंट, महालक्ष्मी कॉलनी, हिम्मतबहादूर परिसर ) यांची ४ कोटी ११ लाख ५६ हजार ६५६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भारत उद्योग लिमिटेड (पूर्वीची जयहिंद कॉन्ट्रॅक्ट लि.,) कंपनीचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्रीचंद राजाराम कुकरेजा व वाशी (नवी मुंबई) येथील करूर वैश्य बँकेचे शाखाधिकारी यांच्यासह एकूण तेराजणांवर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.आशा श्रीचंद कुकरेजा, सूर्यकांत श्रीचंद कुकरेजा, अन्वेशा श्रीचंद कुकरेजा, जयप्रकाश श्रीचंद कुकरेजा (चौघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जयकिशन गुमानसिंग मूलचंदानी (रा. वाशी, नवी मुंबई ), सुजितकुमार दिनानाथ राय (रा. बेलापूर, नवी मुंबई), हरिराम राजाराम कुकरेजा (रा. उल्हासनगर, मुंबई), अशोक राजाराम कुकरेजा, दीपक राजाराम कुकरेजा (दोघेही रा. नेरुळ, नवी मुंबई), महेश राजाराम कुकरेजा (रा. सानपाडा नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, भारत बिल्डर्सने कोल्हापूर महापालिकेच्या मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सि. स. नं. ५१७ /२ ही मिळकत विकसित करण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने घेऊन जेम्स स्टोन्स नावाचे व्यापारी संकुल उभारले. यासाठी करूर वैश्य बँकेकडून कर्ज घेतले. दरम्यान, सुरेश भगवानदास आहुजा या व्यापाऱ्याकडून भारत बिल्डर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्रीचंद कुकरेजा यांनी पंचवीस लाख रुपये मदतीसाठी घेतले. या रकमेची परतफेड करण्यासाठी श्रीचंद कुकरेजा यांनी जेम्स स्टोन्सच्या पहिल्या मजल्यावरील दुकानगाळे विकत घेण्यास सांगितले. ते मान्य करत हा व्यवहार एक कोटी सत्तर लाखाला ठरविला व ही रक्कम चेकने अदा केली. मात्र या इमारतीवर करूर वैश्य बँकेचे कर्ज असल्याने हे दुकान गाळे लिहून देण्यास कुकरेजा टाळाटाळ करू लागले. हे कर्ज फेडण्यासाठी आहुजा यांना जेम्स स्टोन्समधील उर्वरित दुकानगाळे घेण्यास सांगितले व त्या बदल्यात त्यांच्या नावावरील करूर वैश्य बँकेच्या कर्ज खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर पूर्वी ठरलेले दुकानगाळे व उर्वरित सर्व गाळ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र बँकेकडून घेऊन तुम्हाला देतो, असे आश्वासन श्रीचंद कुकरेजा व सूर्यकांत कुकरेजा यांनी आहुजा यांना दिले. गाळे हस्तांतर करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडे १९ लाख ८२ हजार सहाशे छप्पन रुपये भरण्यासही सांगितले. याशिवाय नवीन गाळ्यांची रक्कम करूर वैश्य बँकेच्या गहाण कर्ज खात्यावर भरा, असे कुकरेजा यांनी आहुजा यांना सांगितले.बँकेत अधिक चौकशी केली असता शाखाधिकारी जैना यांनी सांगितले की, तुम्ही कर्ज रक्कम भरल्यानंतर आम्ही नाहरकत प्रमाणपत्र देऊ. त्यांच्यावर विश्वास ठेवून कंपनीच्या कर्ज खात्यावर आहुजा यांनी ३ कोटी ९१ लाख ७४ हजार रुपये चेक व आरटीजीएसद्वारे जमा केले. त्यानंतर आहुजा यांनी श्रीचंद कुकरेजा यांना बँकेकडून नाहरकत दाखला घेण्यासाठी सांगितले. बँकेचे शाखाधिकारी जैना यांनी पहिल्या मजल्यावरील गाळ्यांचा नाहरकत दाखला दिला व उर्वरित गाळ्यांचा नाहरकत दाखला तीनचार दिवसात देतो, असे सांगितले. पण उर्वरित गाळ्यांचा नाहरकत दाखला बँकेकडून मिळाला नाही. त्यासाठी आहुजा यांनी कुकरेजा यांच्याकडे संपर्क साधूनही ते टाळाटाळ करू लागले. अखेर आहुजा बँकेत गेले. तेथे नवीन आलेल्या शाखाधिकाऱ्यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयात जाण्यास सांगितले. तेथे ते गेले असता कुकरेजा यांच्या कंपनीवर बावीस कोटींचे कर्ज असल्याने नाहरकत दाखला देता येत नाही, असे सांगितले. त्यावेळी आहुजा यांना आपली संगनमताने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गांधीनगर पोलीस ठाण्याला तपासाचे आदेश दिल्याने भारत बिल्डर्स कंपनीच्या संचालकांसह तेराजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सुरेश आहुजा यांनी दिली आहे.
दुकानगाळे देतो, सांगून चार कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 1:02 AM