राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बुधवारी (दि. १४ एप्रिल) रात्री आठ ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी जाहीर करताना नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होेते; पण त्याउलट परिस्थिती गुरुवारी सकाळपासून कोल्हापूर शहरात होती. वाट्टेल ती कारणे देत नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनांमधून फिरत होते. सकाळपासूनच शहरातील उपनगरांपासून ते मध्यवर्ती परिसर, भाजी मंडई, बाजारपेठांमध्ये लोक खरेदीसाठी येत होते. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत शहरातील संचारबंदीची स्थिती पाहण्यासाठी फेरफटका मारताना जणू शहराला संचारबंदीतून सूट दिली आहे की काय, अशी शंका आली.
ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कारण विचारले जात होते. लायसन्सची मागणी केली जात होती. योग्य कारण व लायसन्स नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात होती. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजारामपुरीचा बाह्य परिसर, उपनगरांमध्येही सगळीकड़े अशीच वर्दळ होती.
---
प्रत्येकाकडे दवाखान्याची फाईल
दुपारी बारा वाजता बिंदू चौकात पोलीस, ट्रॅफिक पोलीस व कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी येथून जाणाऱ्या नागरिकांना अडवून फिरण्याचे कारण विचारत होते. त्यातील ७० टक्के लोकांनी दवाखान्याचे कारण पुढे केले. पुरावा दाखवा म्हटले की प्रत्येकाच्या डिकीत दवाखान्याची फाईल, औषधांची जुनी चिठ्ठी आहेच. शिवाजी पेठेतल्या महिलेला बिंदू चौकातल्या बेकरीतून पदार्थ घ्यायचे आहेत. कुणाला ट्रेझरीत जायचं आहे, तर कुणाला बँकेत, एकाच्या घरातला किराणा माल संपला आहे, कुणाला भाजी घ्यायची आहे, दुसऱ्याला व्यवसायाच्या साहित्यांची वाहतूक करायची आहे, अशी एक अनेक कारणे देत लोक फिरत होते. या कारणांना संचारबंदीतून सुट दिल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही अशी अडचण पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी मांडली.
--
महाद्वार कडकडीत बंद
शहरात एकीकडे मोठी वर्दळ असताना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोडवर मात्र शुकशुकाट होता. दुकाने शंभर टक्के बंद होती. काही भाजी विक्रेते तेवढे रस्त्याकडेला बसले होते. राजारामपुरीतही शांतता होती. त्या उलट स्थिती लक्ष्मीपुरीत होती. इथे व्यावसायिकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होती.
---
९ ते ११ ची वेळ द्यावी
संचारबंदी होणार हे माहीत असल्याने लोकांनी बुधवारपर्यंत किराणा मालासह अत्यावश्यक सेवेतील वस्तूंचा साठा करून ठेवला होता. तरी दुकाने दिवसभर सुरू आहेत, म्हणून खरेदीला बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने या अत्यावश्यक सेवेतील खरेदीसाठी रोज सकाळी नऊ ते अकरा अशी वेळ ठरवून द्यावी व त्यानंतर पूर्ण व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा या संचारबंदीला काही अर्थ राहणार नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी व सुजाण नागरिकांनी दिली.
--
फोटो फाईल स्वतंत्र
-