कोल्हापूर : तब्बल ८१ दिवसांनंतर कोल्हापूर शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने सोमवारी सकाळी सुरू केली. मात्र, व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार पुन्हा दुपारी साडेतीननंतर दुकाने बंद केली. दुकाने सुरू करण्यावरून महाद्वार रोड येथे व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि महापालिकेच्या भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात वादावादी झाल्याने याठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनने केलेल्या आवाहनानुसार दुकाने सुरू करण्यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मी रोड, शाहपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरातील बहुतांश व्यापारी, व्यावसायिक आपापल्या दुकानांमध्ये आले. जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने उघडल्यास संबंधित व्यापारी, व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महाद्वार रोड येथे महापालिकेचे १६ जणांचे पथक दाखल झाले होते. दंडात्मक कारवाई होईल या भीतीने महाद्वार रोड, गुजरीतील अनेक व्यापारी आपापल्या दुकानाच्या दारात थांबून होते. काहींनी दुकानाचे अर्धे दार, शटर उघडले होते. महापालिकेचे पथक आल्याचे समजताच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक राहुल नष्टे, संपत पाटील, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार, संचालक शिवाजी पाटील आदी याठिकाणी आले. ‘दुकाने सुरू करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, ‘कारवाई होऊ देत नाही’, असे सांगत दुकाने सुरू करण्याचे आवाहन करत महाद्वार रोड, गुजरी परिसरातून फेरी मारली. जोतिबा रोडच्या चौकात महापालिकेच्या भरारी पथकातील अधिकारी सचिन जाधव, पंडित पोवार आदींसह कर्मचारी थांबले होते. तेथे व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आले. त्यांच्यात दुकाने सुरू करण्यावरून शाब्दिक चकमक झाल्याने तणाव निर्माण झाला. अधिकारी आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आपल्या भूमिका, मुद्यावर ठाम राहिले. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेतच्या बैठकीतील चर्चेनंतर पुढील भूमिका घेण्याचे या दोन्ही घटकांनी ठरविल्याने येथील वातावरण निवळले. त्यानंतर शासनाने सर्व दुकाने सुरू करण्यास रीतसर परवानगी द्यावी. त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन व्यापारी संघटनांनी दुपारी दीडच्या सुमारास केले. त्यानंतर काही व्यापाऱ्यांनी, तर बहुतांश जणांनी दुपारी चारनंतर दुकाने बंद केली.
चौकट
दोऱ्या आणून द्या, आम्ही आत्महत्या करतो
गेल्या अडीच महिन्यांपासून दुकाने बंद असली, तरी आमचा घरफाळा, पाणीपट्टी, वीज बिल कमी केलेले नाही. दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, नाही तर आम्हाला दोऱ्या आणून द्या, आम्ही आत्महत्या करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.
चौकट
सकाळी बाजारपेठांमध्ये गर्दी
दुकाने सुरू करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासून व्यापारी आल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेतची बैठक सुरू होईपर्यंत बहुतांश दुकाने सुरू झाली. त्यामध्ये सराफ, कपडे, स्टेशनरी, मोबाईल आदी दुकानांचा समावेश होता. दुकाने उघडल्यानंतर आतील साफसफाई, उत्पादने योग्य पद्धतीने लावणे, आदी स्वरूपातील कामे व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली. दुपारी चारनंतर पुन्हा दुकाने बंद केली. त्यानंतर या बाजारपेठांमध्ये पुन्हा शुकशुकाट पसरला.