कोल्हापूर : भवानी मंडप ते बिंदू चौक या रस्त्यावर करवीर नगर वाचन मंदिरसमोर पार्किंग केलेली ओमनी व्हॅन शॉर्टसर्किट होऊन पेटल्याने गोंधळ उडाला. प्रसंगावधान ओळखून चालकासह गाडीतील लोक जिवाच्या भीतीने बाहेर पडले. काही क्षणांतच संपूर्ण गाडीने पेट घेऊन धुराचे लोट बाहेर पडू लागले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भवानी मंडपापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने नागरिक व भाविक भीतीने सैरावैरा पळत सुटले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन बंबांद्वारे पाण्याचा फवारा मारून आग विझविली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. अधिक माहिती अशी, युवराज सुभाष पाटील हे आयसीआरई इंजिनिअरिंग कॉलेज, गारगोटी येथे प्राध्यापक आहेत. ते कॉलेजच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी संजय शंकर भारमल यांची व्हॅन घेऊन रविवारी सकाळी कोल्हापूरला आले. सायंकाळी सहा वाजता त्यांनी गाडी करवीर नगर वाचन मंदिरासमोर पार्क केली. नातेवाइकांना फोन लावून त्यांनी गाडीजवळ येण्यास सांगितले. सर्वजण गाडीत येऊन बसले. यावेळी ते कपबशी खरेदी करून येतो म्हणून गेले. आल्यानंतर त्यांनी गाडी सुरू करताच मोठा आवाज होऊन गाडीतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. भीतीने गाडीतील महिला व पाठोपाठ तेही बाहेर पडले. यावेळी काही कळायच्या आतच संपूर्ण गाडीने पेट घेतला. नागरिकांनी महापालिका अग्निशामक दल व जुना राजवाडा पोलिसांना कळविले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला... ओमनी व्हॅनमध्ये पाठीमागील बाजूस गॅस सिलिंडर होते. आगीचे उग्र रूप पाहता ते फुटण्याची भीती व्यक्त करीत आजूबाजूचे व्यापारी दुकाने बंद करून दोनशे मीटर अंतरावर जाऊन थांबले; तर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शिवाजी चौकातून भवानी मंडपाकडे येणारी सर्व वाहने रोखून धरली.
‘करवीर नगर’जवळ शॉर्ट सर्किटने व्हॅन जळून खाक
By admin | Published: August 22, 2016 12:43 AM