इचलकरंजी : राज्य शासनाने बुधवारी (दि. १४) सायंकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार गुरुवारी शहरात अत्यावश्यक सेवा, बॅँका, एटीएम, रिक्षा, सरकारी कार्यालये, वाहतूक वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुख्य मार्गावर तुरळक गर्दी दिसत होती; परंतु अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ तसेच अनावश्यक गर्दी दिसत होती. त्यामुळे नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र होते.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्र राज्यात आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात बुधवारी सायंकाळपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्य मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली.
किराणा दुकान, बेकरी, भाजीपाला व फळफळावळ यांची विक्री सुरू होती. काही नागरिक शहरात अजूनही मास्क न वापरता फिरत होते. यावेळी वाहतूक पोलीस विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांची चौकशी करत होते. शहर व परिसरात नियमांचे पालन करून काही यंत्रमागधारकांनी आपले उद्योग सुरू ठेवले होते. मुख्य मार्गावर बंद दिसत असला तरी अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी दुकाने सुरू होती. तसेच मोठी वर्दळ होती.
फोटो ओळी
१५०५२०२१-आयसीएच-०२
नेहमी गजबजलेल्या के. एल. मलाबादे चौकात शुकशुकाट होता.
१५०५२०२१-आयसीएच-०३
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानगाळे बंद होते.
१५०५२०२१-आयसीएच-०४ फळ मार्केटमध्ये तुरळक गर्दी होती.
सर्व छाया-उत्तम पाटील