कोल्हापूर : सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद्वारे केली गेली.बहुजन मुक्ती मोर्चा व बामसेफतर्फे वामन मेश्राम यांच्या आवाहनानुसार बुधवारी देशभर बंद पुकारण्यात आला होता. कोल्हापुरातही बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंद असल्यामुळे कोल्हापुरात सकाळपासून व्यापारी, दुकानदार दुकाने उघडायची की नाहीत या संभ्रमात होते. अंदाज येत नसल्याने प्रत्येकाने दुकानाचे शटर अर्धेच बंद केले होते.अकराच्या सुमारास बहुजन मुक्ती मोर्चाचे संयोजक महेश बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र जमले. शाहू महाराजांना अभिवादन करून तिथे एनआरसीविरोधात घोषणा दिल्यानंतर ते बिंदू चौकाकडे मार्गस्थ झाले.
येथे प्रमोद हर्षवर्धन, समीर मुजावर, महेश बावडेकर, हिदायत मणेर, मौलाना बशीर यांनी मनोगत मांडले. यात एनआरसीला कडाडून विरोध करताना डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व ठरवावे, अशी मागणी केली. तशा घोषणाही उपस्थितांनी दिल्या. दरम्यान, मोर्चा संपल्यानंतर १२ वाजल्यापासून कोल्हापुरातील सर्वच दुकाने, व्यवहार पूर्ववत झाले. दिवसभर कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.मोर्चात गौरव मनोरकर, मौलाना असिफ, मौलाना अझर, मौलाना समीर, मोहन सरदार, कुलदीप जोगडे, चंद्रकांत नागावकर यांनीही सहभाग घेतला.