बुबनाळ : औरवाड जुन्या पुलावर मासेमारीसाठी मोठी गर्दी होत आहे. नवीन पूल सुरू झाल्यामुळे या पुलावरून रहदारी कमी झाली आहे. याचा फायदा घेत दररोज पुलावरून व परिसरात नदीकाठालगत मासेमारी करण्यासाठी गर्दी होत आहे. काही वर्षांपूर्वी नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर मासेमारीवरून हाणामारी झाली होती. त्यावेळी शांतता बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी हणमंत पवार यांनी नृसिंहवाडी-औरवाड पूल ते कृष्णा-पंचगंगा संगम मंदिरापर्यंत मासेमारीसाठी बंदी घातली होती. तरीदेखील मासेमारी सुरू आहे. प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
------------------------
जलपर्णी हटवा
शिरोळ : नांदणी (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित झाले आहे. जलपर्णी असल्यामुळे पाण्यातील मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे ही जलपर्णी हटवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
------------------------
जयसिंगपूरची सिध्देश्वर यात्रा रद्द
जयसिंगपूर : येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवाची यात्रा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय यात्रा समितीच्यावतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष शामसुंदर मालू, संभाजी मोरे यांनी दिली. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवाची यात्रा अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पाच दिवस यात्रा विविध कार्यक्रमांनी पार पडत असते. मात्र, शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही यात्रा रद्द केली असल्याचा निर्णय यात्रा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अमरसिंह निकम, रमेश देशपांडे, राजेंद्र दाईंगडे, बबन हतळगे, अॅड. गजानन आंबेकर, संजय कुलकर्णी, शामराव बंडगर, राजेंद्र शहापूरे, नंदकिशोर मालू, दिलीप जंगम उपस्थित होते.