कोल्हापूर : योग विद्याधाम संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचा योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी १२ वी पास, वय वर्षे १८ पूर्ण असणे गरजेचे आहे. पदवी मिळाल्यानंतर शाळा, योगसंस्था, क्रीडा केंद्रे, फिजिओथेरपी क्लिनिक याठिकाणी नोकरीची संधी तसेच स्वतंत्रपणे योगवर्ग सुरू करता येतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी योग विद्याधाम, कोरगांवकर हॉल, राजारामपुरी १४ वी गल्ली येथे दुपारी साडेबारा ते ३ या वेळत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
वीज बिल फाडो आंदोलन
कोल्हापूर : वीज बिल माफीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयांसमोर वीज बिल फाडो व कंदील आंदोलन करण्यात आले.
या वेळी २०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, मीटर भाडे कपात करावी, विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भावप्रमाणे दर आकारावे, सक्तीची वीज बिल वसुली तत्काळ थांबवावी, बिल भरलेल्या ग्राहकांसाठी अभय येजना तयार करून पुढील वर्षभरात वीज बिल नील पाठवावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी सिद्धार्थ नागरत्न, उमाजी जाधव, सागर सुतार, किरण पटवर्धन, प्रवीण बोरवडेकर, विजय सुतार उपस्थित होते.
--
अध्यक्षपदी महेश यादव
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा ओेबीसी मोर्चा अध्यक्षपदी महेश बाळासो यादव यांची निवड करण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल चिक्कोडे, महेश जाधव, संदीप कुंभार यांचे सहकार्य लाभले.
--
फोटो नं ०६०७२०२१-कोल-महेश यादव (निवड)
----
लसीकरण तातडीने करावे
कोल्हापूर : जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे तातडीने लसीकरण करावे, या मागणीचे निवेदन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. जिल्ह्यात या वयोगटातील तरुणांची संख्या १८ लाखांहून अधिक असून सहा हजारांहून कमी लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तरी युद्धपातळीवर त्यांचे लसीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी संघटनेचे जिल्हा निमंत्रक प्रफुल्ल पाटील, संदेश जाधव, सुबोध साळोखे, शुभम पाटील, उमेश शिंदे, प्रवीण जाधव उपस्थित होते.
---