कोल्हापूर : लघुपट हे मानवी भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलेले आहे. लघुपटातून व्यक्तीचे भावनाविश्व सहजपणे उमगते. असे प्रतिपादन युवा लघुपट दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी केले. त्या शाहू स्मारक येथे कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबतर्फे मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हलमध्ये आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या.या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या चाफा, ‘ दिसाड दिस’ या शॉर्टफिल्मबरोबरच स्थानिक युवा दिग्दर्शकांनी बनवलेल्या सात फिल्म दाखवण्यात आल्या. यावेळी दिग्दर्शिका मानसी देवधर आणि नागनाथ खरात यांनी प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला.देवधर म्हणाल्या, कोकणातील निसर्ग आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या मुलाचे भावविश्व मी ‘चाफा‘ या लघुपटातून मांडले आहे. हा लघुपट बनवताना मी माझ्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला. कोणताही चित्रपट बनवताना एक त्रयस्तपणे तो बनवणे गरजेचे आहे. लघुपट बनवण्यासाठी स्क्रिप्ट, फोटोग्राफी या सर्वांचा वापर केला.
नागनाथ खरात म्हणाले, ‘दिसाड दिस‘ लघुपटात तीन व्यक्तींच्या जीवनाचे दर्शन घडते. यामध्ये दोन व्यवस्थेतील फरक अत्यंत मार्मिकपणे यातून मांडला आहे. अत्यंत भावनिक आणि मनाचा ठाव घेणारा हा लघुपट आहे.
दरम्यान भावताल, ब्लॅक कॉफी, वारसा, डोंट, गो- ग्रीन, दोरखंड, कॉफी हे स्थानिक दिग्दर्शक आणि कलाकारांनी साकारलेले लघुपट दाखवण्यात आले.
यानिमित्त मयूर कुलकर्णी (भावताल), आशुतोष नाखे(ब्लॅक कॉफी), वारसा (संग्राम भालकर), स्वप्निल पाटील (डेप्थ), डोन्ट (सागर बगाडे), केवल लोट(गो ग्रीन), दोरखंड (नरेंद्र देसाई), निखिल पाटील (कॉफी) यांनी मनोगत व्यक्त केले.महोत्सवाचे संयोजन अजय कुरणे, संदीप गावडे, अमर कांबळे, विजय कुलकर्णी, समीर पंडितराव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मयूर कुलकर्णी यांनी केले.