कोल्हापूर : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई शनिवारीदेखील कायम राहिली. शुक्रवारी आलेली ७०० इंजेक्शन हातोहात संपल्याने इतरांना हात हलवीत परत जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातही इंजेक्शनसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातून रेमडेसिविरची जवळपास ६५ हजार इंजेक्शनची मागणी शासनाकडे नाेंदविण्यात आली आहे. त्यात वैद्यकीय महाविद्यालयातून १५ हजार, खासगीतून १५ हजार, तर सरकारी दवाखान्यांतून ३५ हजार अशी इंजेक्शन्सची मागणी आहे. शुक्रवारी यातील केवळ ७०० इंजेक्शन उपलब्ध झाली; पण शनिवारी तीही संपल्याने इंजेक्शनसाठी धावाधाव करण्याची वेळ नातेवाइकांवर आली.
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णामध्ये ऑक्सिजनही पातळी कमी झाल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन सुरू केले जातात. एका रुग्णाला सहा याप्रमाणे हा डोस दिला जातो; पण सुरुवातीला इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर नेमकी गरज आहे, त्यांच्याऐवजी नको त्यांना ते इंजेक्शन घेऊ दिले गेले. शिवाय गरज नसतानाही सुरुवातीच्या काळात इंजेक्शन रुग्णांना दिले गेले. गावोगावच्या लहान डॉक्टरांनीदेखील हे इंजेक्शन घेऊन ठेवले. यातून साठेबाजी वाढत जाऊन त्याचा आता काळाबाजार सुरू झाला आहे.
हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला गेला, तरीदेखील काहीही परिणाम झालेला नाही. इंजेक्शनची पळवापळवी सुरू असल्याने अत्यंत गरजू असलेल्या रुग्णांना ते मिळणे दुरापास्त झाले आहे. नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव करीत आहे. पुणे, सांगलीतही उपलब्ध होत नसल्याने जादा पैसे मोजून बेळगावमधूनदेखील मागविले जात आहे.
चौकट ०१
वापराबाबत प्रबोधन गरजेचे
यासंदर्भात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रेमडेसिविरचा गैरवापर सुरू झाल्यानेच टंचाई जाणवत असल्याचे सांगितले. कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णाचे सीटी स्कॅन ॲडमिट झाल्याच्या तीन दिवसांनी करावयाचे असते; पण सध्या पहिल्या दिवशीच केले जात असल्याने कोरोनाची तीव्रता कळत नाही, पुढे चार दिवसांनंतर कोेरोना उग्र स्वरूप धारण करतो. त्यामुळे रेमडेसिविरसह सिटी स्कॅनच्या वापराविषयीही प्रबोधनाची गरज असल्याचे सांगितले.