कोल्हापूर : सुरुवातीच्या काळात लस उपलब्ध होती, पण लाभार्थी नव्हते. आता लाभार्थ्यांची संख्या वाढली आणि लसच उपलब्ध नाही अशी विचित्र परिस्थिती कोल्हापूर शहरात निर्माण झाली आहे. आता कोठे लसीकरणाला वेग येत असतानाच लसीच्या तुटवड्याचे विघ्न आले. आता तर शहरातील सर्व १३ लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की महानगरपालिका प्रशासनावर आली.
कोल्हापूर शहरातील लसीकरणाची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर आहे. शहरात लसीकरणाकरिता अकरा नागरी आरोग्य केंद्रे तसेच विक्रम नगर व फुलेवाडी येथे तात्पुरती सोय करण्यात आली होती. १६ जानेवारीपासून ही मोहीम सुरू झाली. सर्वप्रथम केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. परंतु त्यांच्याकडून सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही. आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारीच लस टोचून घेत नाहीत म्हटल्यावर लसीकरणाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले.
त्यानंतर काही दिवसात ६० वर्षावरील नागरीक व ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरीकांना लसीकरण सुरु केले. तेथेही प्रतिसाद थंडच होता. १६ फेब्रुवारीपासून ४५ वर्षावरील सरसकट सर्वांना लस देण्यास सुरवात झाली आणि जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरु झाला. लस हेच एकमेवर हत्यार आहे, याची जाणीव झाल्यानंतर मात्र लसीकरण केंद्रावर गर्दी व्हायला सुरवात झाली.
एकीकडे लसीकरण केंद्रावर गर्दी वाढायला लागली आणि लसीचा तुटवडा जाणवायला लागला. मागणी करुनही डोस मिळत नाहीत म्हटल्यावर महापालिकेला काही केंद्रे बंद ठेवावी लागली. पुन्हा लस उपलब्ध झाल्यानंतर ती सुरु झाली. गुरुवारी तर महापालिकेकडील सर्व लसीचे डोस संपले. त्यामुळे दुपारनंतर सर्वच केंद्रे बंद ठेवण्याची नामष्की ओढवली. महानगरपालिकेला दिवसाला तीन ते साडेतीन हजार डोस लागतात, त्या हिशेबाने पुढील दहा दिवसाकरिता ३० हजार ते ३५ हजार डोसची मागणी होते. पण ती मिळत नाही. दोन दिवस लसीकरण सुरु दोन दिवस बंद असा सावळा गोंधळाचा खेळ सुरु आहे.
- महापालिका हद्दीतील लाभार्थी -
१. ४५ वर्षावरील व्यक्ती - १ लाख ८० हजार ६०५२
२. हेल्थ केअर वर्कर्स - ११ हजार ४६१
३. फ्रंटलाईन वर्कर्स - ५०४७
- प्रत्यक्ष मिळालेली लस -
- कोविशिल्ड - ८८ हजार १२० डोस
- कोवॅक्सीन - ६००० डोस
- एकूण मिळाले - ९४ हजार १२०