धामोड - (ता.राधानगरी ) --धामोड व बेले (ता.राधानगरी ) येथील डोंगरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड झाली आहे . महिनाभरापूर्वी ही वृक्षतोड झाली असताना व तक्रारदार शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई पर्यंतच्या वनविभागाच्या कार्यालय प्रमुखांना तक्रारी दिल्या असताना देखील म्हासूर्ली वनपाल व वनरक्षक सदर प्रकरणावर कारवाई करण्याची ऐवजी तक्रारदार शेतकऱ्याला उपदेशाचे डोस देऊन सदर प्रकरणात तडजोड करण्याची भाषा वापरत आहेत . शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे .
लॉकडाउनच्या संधीचा फायदा घेत राशिवडे खुर्द बेले व धामोडदरम्यानच्या डोंगरमाथ्यावरील शेतीच्या बांधावरील साडेचारशे झाडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे .सचिन पाटील व त्याचे चुलत भाऊ अशा चौघांच्या हिस्स्यातील आठरा एकराच्या शेतीच्या बांधावर वडिलोपार्जित आंबा, साग,सिसम,खैर ,फणस अशा मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यास आली होती. पण लॉकडाउनचा फायदा घेत दिनकर रामचंद्र पाटील,शंकर रामचंद्र पाटील,वेताळ विठ्ठल पाटील यांनी परस्पर सामुदायिक शेतीमधील साडेचारशे झाडे सचिन व नरेश पाटील यांना विचारात न घेता अवघ्या दोन दिवसात तोडली. धामोड येथील ठेकेदाराने कटरच्या साहाय्याने या झाडांची कत्तल करून सुमारे ८ते दहा लाखाचे दहा ट्रक लाकूड धामोड मार्गे चोरून विक्रीस पाठवले.
पाच हिस्सेदारांच्या शेतीच्या बांधावरील ही झाडे तोडण्यासाठी कोणताही प्रकारचा परवाना घेतलेला नाही. वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी वेताळ पाटील यांनी वन विभागाला हाताशी धरूनच या झाडांची कत्तल केली आहे . याासंबंधीची तक्रार वन विभागाच्या राधानगरी कार्यालयात नोंदवली आहे.पण या तक्रारीची साधी दखल सुध्दा घेतली नसल्याचे सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.राधानगरी वन विभागावाडे तक्रार देऊन महिना उलटला तरी कोणतीच कारवाई होत नसल्याने आपण मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुंबई व नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंद केली आहे. झाडे तोडणीची परवानगी न नसताना किंवा ठेकेदाराचा परवाना देखील नसताना लाखो रुपयाच्या झाडांची कत्तल वन विभागाचे ऑफास असणाऱ्या गावात होत असताना वनरक्षक व वनपाल नेमके कोणाचे रक्षण करण्यात गुंतलेले आहेत? दहा ट्रक लाकडाची वाहतूक वन विभागाच्या कार्यालयाच्या दारातून होत असताना वन विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते .असा प्रश्न सचिन व नरेश पाटील बंधूंनी विचारला असून याची पाळेमुळे शोधून आम्हा गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारी द्वारे केली आहे.