संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने देशातील १९१ महिलांना खासदार होण्याची संधी मिळणार आहे. त्यात शौमिका महाडिक यांनाही खासदार व्हायचंय परंतू महाराष्ट्रातही आमदारांची संख्या वाढणार आहे तिथे कुणाला पाठवायचे अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी येथे केली.
भाजपच्यावतीने घरे चलो अभियानांतर्गत गुजरी कॉर्नरला झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे, राहूल देसाई, विजय जाधव, अशोक देसाई आदी उपस्थित होते.
महिला आरक्षणानंतर अनेक महिलांना खासदार होण्याची संधी आहे, तुमच्यातील कुणाला खासदार व्हायचे आहे अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. त्यावर दोन-तीन महिलांनी हात वर केले. तोपर्यंत कार्यकर्त्यांतून शौमिका महाडिक यांचे नांव घेतले. तो संदर्भ घेत बावनकुळे म्हणाले, बघा, शौमिका महाडिक यांनाही खासदार व्हायचंय परंतू महाराष्ट्रातील महिला आमदारांचीही संख्याही शंभरने वाढणार आहे. तिथे कुणाला निवडून देणार..? हा कार्यक्रम महाडिक यांनी फेसबूक लाईव्हही केला होता. त्यामुळे सोशल मिडीयावर भावी खासदार..आता २०२४ च अशा कॉमेंट त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शेअर झाल्या.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले. सर्व हाताला काम दिले. ६८ वर्षात जे झाले नाही ते ९ वर्षात केले. पंतप्रधान म्हणून मोदी यांना कोल्हापूरकरांनी जो प्रतिसाद दिला, तो या अभियानात दिसून आला. भाजपच्या घर चलो अभियानांतर्गत अमृत कलश हातात घेउन बावनकुळे यानी खरी कॉर्नरपासून महाद्वार रोडमार्गे चालत गुजरीपर्यंत लोकांच्या भेटी घेतल्या. सुरुवातीला त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्निल पाटील, अनिल पोवार, शुक्ला बीडकर, विजय मोरेसह बिभिषण पाटील, संजय पाटील यांचा मोदींचे पुस्तक देउन सत्कार केला. त्यांचे अंबाबाई हक्कदार श्रीपूजक, ब्राम्हण पुरोहित संघ, बहुउद्देशीय ब्राम्हण संघ, ग्रामविकास संघ, शहर ओबीसी माेर्चातर्फे स्वागत झाले. याचे नियोजन माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, किरण नकाते, माधुरी नकाते, रुपाराणी निकम, गायत्री राउत यांनी केले.