कोल्हापूर : हद्दवाढ आम्ही केली नाही म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांची आता राज्य व केंद्रात सत्ता आहे, मग त्यांना हद्दवाढीपासून कोणी रोखले? अशी विचारणा करत शौमिका महाडीक यांचा विधानसभा निवडणूकीसाठीच ही स्टंटबाजी असल्याचा टोला काँग्रेसच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीनी हद्दवाढीला पाठींबा देणारे ठराव करावेत, असे आव्हान भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडीक यांनी आमदार सतेज पाटील यांना दिले होते. महापालिकेमध्ये अनेक वर्षे दोन्ही काँग्रेसची सत्ता हाेती, पालकमंत्रीही त्यांचे होते मग हद्दवाढ का केली नाही? सचिन चव्हाण यांनी आपल्या आमदारांना काळे झेंडे का दाखवले नाहीत असा सवालही त्यांनी केला होता. यावर, सचिन चव्हाण यांनी मंगळवारी पलटवार केला.काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, हद्दवाढ विरोधी कृती समितीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी असतात, तिथे सर्वानुमते निर्णय घेतले जातात. या चळवळीत काम करण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या पासून गेली ५० वर्षे आम्ही हद्दवाढीच्या बाजूनेच भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला कोणी सांगत बसू नये. आम्ही व आमचे नेते सतेज पाटील सक्षम असून तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही.सतेज पाटील यांनी थेट पाईप लाईन, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणासह अनेक विकासाची कामे केली, हे कोल्हापूरच्या जनतेला माहीती आहे. आता महापालिकेवर प्रशासक आहे, राज्य व केंद्रात तुमची सत्ता आहे. मग आता हद्दवाढ करायला तुम्हाला कोणी रोखले? हद्दवाढ व्हावी म्हणून तुम्ही महापालिकेत किती बैठका घेतल्या, शासन पातळीवर कोणते प्रयत्न केले? याचे उत्तर महाडीक यांनी द्यावीत. यावेळी संजय पोवार-वाईकर उपस्थित होते.अमल महाडीक यांचे पत्र योग्य वेळी बाहेर काढूमहाडीक यांनी हद्दवाढीबाबात दुटप्पी भूमिका बंद करावी, अमल महाडीक हे आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हद्दवाढ करु नये, असे पत्र दिले होते. त्याची प्रत माझ्याकडे असून याेग्य वेळी बाहेर काढू, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
राज्यात, केंद्रात सत्ता मग तुम्हाला कोल्हापूरच्या हद्दवाढीपासून कोणी रोखले, काँग्रेसची विचारणा
By राजाराम लोंढे | Published: June 25, 2024 7:34 PM