कोल्हापूर : हातकणंगलेलोकसभा मतदारसंघासाठी भाजपने शेवटपर्यंत टोकाचा आग्रह धरल्यामुळे पुन्हा एकदा शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत आले आहे. दुसरीकडे खासदार धैर्यशील माने यांनीही सोमवारी पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला.या मतदारसंघातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत आणि सर्वेक्षणांबाबत भाजपने अभ्यास करून कोल्हापूरची राहू दे परंतु हातकणंगलेची जागा द्या असा आग्रह धरला होता.कोल्हापूरसाठी संजय मंडलिक यांची उमेदवारी टाळणे तितके सोपे नाही हे भाजपच्या वरिष्ठांच्याही लक्षात आले; परंतु हातकणंगलेमध्ये तशी परिस्थिती नाही. या मतदारसंघात भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार विनय कोरे हे वजनदार नेते मतदारसंघात ताकद दाखवू शकतात. महाडिक यांचाही गट सक्रिय असून या मतदारसंघातील वाळवा तालुक्यातही महाडिक गटाची ताकद आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून ही जागा भाजपला मिळावी यासाठी ताकद लावली आहे.
सोमवारी धैर्यशील माने यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी चर्चा केली असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे सेनापती आहेत. ते माझ्या मतदारसंघाचा काही दिवसांपूर्वीच दौरा करून गेले आहेत. प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी नियोजन सुरू असल्याने उमेदवारीला विलंब हाेत आहे. मी मतदारसंघात फिरत असून समाजातील सर्व घटकांनी भेटण्याचे काम सुरू आहे. शिंदे यांच्या बंडावेळी आम्ही १३ खासदारांनी भाजपचे नेते अमित शाह यांच्याशी चर्चा केली तेव्हाच आम्हाला उमेदवारीबाबत आश्वस्त करण्यात आले होते.
मला दृष्ट लागू नये म्हणूनमाझे आजोबा पाचवेळा खासदार झाले. प्रत्येक निवडणुकीला त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा व्हायची आणि ते आधीपेक्षा जास्त मतांनी निवडून यायचे. असाच प्रकार यावेळी सुरू आहे. मला दृष्ट लागू नये म्हणूनच अशी चर्चा काही जणांकडून सुरू असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.