मागील दोन महिन्यांत विविध वस्तू खरेदीत व प्रशासकीय खर्चात घोटाळा झाल्याची तक्रार नूतन ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीनुसार गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत तपासणीबाबतचे आदेश दिले होते. ही तपासणी पूर्ण करून तो अहवाल तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामविकास अधिकारी कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस पाठविले असल्याची माहिती विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे यांनी दिली.
ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना ग्रामविकास अधिकारी कांबळे यांनी बल्ब व खुर्ची खरेदी, पाणीपुरवठा विभागातील गळती काढणे याबाबतच्या खर्चात तफावत आढळली होती. नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांना याबाबत जाब विचारला होता. यासंबंधी तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी झाली होती. दरम्यान, प्रशासकीय काळातील सर्वच गोष्टींची चौकशी करून ग्रामपंचायतीचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करावा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करू, असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष विवेक चौगुले यांनी दिला आहे.