शहरात ‘एचआरसीटी’ चाचणी करण्याकरिता जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे येत आहेत. त्यामुळे बलकवडे यांनी शहरातील डायग्नोस्टिक सेंटरची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उपायुक्त शिल्पा दरेकर व सहायक आयुक्त विनायक औंधकर व चेतन कोंडे यांनी फोर्ड कॉर्नर येथील युरेका डायग्नोस्टिक ॲण्ड रिसर्च सेंटरला अचानक भेट देऊन तपासणी केली.
त्याठिकाणी या सेंटरने रुग्णांकडून एचआरसीटीसाठी जादा दर आकारल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर डॉक्टरांच्या शिफारसपत्राशिवाय १० रुग्णांचे एचआरसीटी स्कॅन केले असल्याचेही निदर्शनास आले. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था केलेली नव्हती. सेंटरमध्ये सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. सेंटरचा बाहेर कोणताही सूचना फलक लावलेला नव्हता. येणाऱ्या रुग्णांना व नागरिकांसाठी सॅनिटाईज अंशत: केले जात होते. रुग्णांची लूट व गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले.
शासनाने ठरवून दिलेल्या दराचे उल्लघंन केल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत खुलासा करणे बंधनकारक केले आहे. वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम व कोविड उपाययोजना नियमांअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.