दत्ता बिडकर - हातकणंगले.
तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल तसेच कामातील हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याने रुकडी, माणगांव, चंदूर, अतिग्रे, पट्टणकोडोली आणि हेरले या सहा गावच्या ग्रामसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या असून, सहा गावांतील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विस्तार अधिकारी यांना देण्यात आल्याने गावपातळीवरील प्रशासन हादरून गेले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत सहा गावांमध्ये पाणंद रस्त्याच्या कामामध्ये हातकणंगले पंचायत समितीकडे तक्रारी प्राप्त झाल्याने रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या कामाच्या चौकशीचे आदेश झाल्यानंतर गावपातळीवरील प्रशासन हादरून गेले आहे. रोजगार हमीच्या कामावर देखरेखीपासून मजुराच्या पडताळणीपर्यंतच्या सर्व कामाकडे दुर्लक्ष करून कामाबाबत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून ग्रामसेवकांना जबाबदार धरून गावातील कामाबाबतची वस्तुस्थिती लपविल्याच्या कारणास्तव रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी पंचायत समिती जा. क्र. ७७ / दि. १८ जानेवारी २०२१ रोजी रुकडी, माणगांव, चंदूर, हेरले, पट्टणकोडोली आणि अतिग्रे या सहा गावांतील रोजगार हमीच्या २ कोटी ६०च्या पाणंद रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू आहे का, याची पडताळणी करण्याचे तसेच या कामावर काम करणारे मजूर, त्यांची जॉबकार्ड तपासणी करून झालेल्या कामाचे पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वर्षानुवर्ष जे पाणंद रस्ते शेतीकामासाठी वापरले जातात, परिसरातील साखर कारखान्याच्या माध्यमातून डागडुजी केली जाते. शेतकरी उसाच्या वाहतुकीसाठी प्रतिवर्षी पाणंद रस्ते स्वखर्चाने दुरुस्त करतात, अशा गावपातळीवरील पाणंद रस्त्याची निवड करून निधी मुरविण्याचा नवा फंडा शोधून काढल्यामुळे प्रशासनाची ही डोकेदुखी वाढली आहे.
( समाप्त )