लोकमत न्यूज नेटवर्कआवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील ५६ कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)ने केलेल्या कारवाईमधील ज्या वीस कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस आदेश बजावण्यात येणार होते, त्यापैकी पाच कंपन्यांना आज (शनिवारी) कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. त्यामुळे भरारी पथकाने कंपन्यांना दिलेला हा दुसरा झटका मानण्यात येत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीत भरारी पथकाने सुरु केलेले कारवाईचे शस्त्र पुन्हा मागील आठवड्यापासून उपसले आहे. त्यामध्ये प्रथम एक्सेल इंडस्ट्रीज, नंदादीप केमिकल, हरीश्री ओरोमेटिक, उर्ध्वा केमिकल व श्रीया केमिकल या पाच कंपन्यांना उत्पादन बंदची नोटीस बजावून कारवाई करण्यात आली. पैकी एक्सेल इंडस्ट्रीज वगळता इतर चौघांचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून बंद करण्यात आला असून, पाचहीजणांचा वीज पुरवठा महावितरणकडून काल गुरुवारी खंडित करण्यात आला आहे. त्यानंतर आज हाती आलेल्या माहितीनुसार येथील अरोमा इंटरमिडीएटस, पॅक्ट लॅब प्रा. लि., योजना इंडस्ट्रीज, पार्को फार्मास्युटिकल्स अँड केमिकल व थम्स आॅर्गेनिक या पाच कंपन्यांना कारण ेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.शनिवारी सुटी असल्याने एमपीसीबीच्या कार्यालयाशी संपर्क झाला नसला, तरी संबंधित कंपनी मालकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक रासायनिक प्रक्रिया अद्ययावत नसणे, सांडपाणी सीईटीपीला सोडण्याच्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाड आदी कारणे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचे समजते. दि. १९ रोजी या पाचही कारखानदारांना याचा खुलासा करण्यासाठी माटुंगा (मुंबई) येथील एमपीसीबीच्या मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भरारी पथकाच्या या कारवाई प्रक्रियेत आणखी कुणाची नावे समाविष्ट आहेत का, हे लवकरच समोर येणार असल्याचे समजते. एकीकडे ही कारवाई प्रक्रिया सुरु असतानाच येथील उर्ध्वा केमिकलचे पाणी व वीज पुरवठा बंद असतानाही शनिवारी दुपारी कंपनीचे सांडपाणी उघड्यावर आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.सर्वस्तरातून स्वागतलोटे वसाहत परिसरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरु केल्याने त्याचे परिसरातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.
पाच उद्योगांना कारणे दाखवा नोटीस जारी
By admin | Published: July 08, 2017 10:04 PM