कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, त्यासाठी त्रुटी दाखविणाºयाचे स्वागत केले पाहिजे; पण त्याचे राजकीय भांडवल केले तर ते संस्थेसाठी घातक असते. ‘गोकुळ’बाबत सध्या हेच सुरू असून, सतेज पाटील यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे; पण त्यांचा त्यामागील उद्देश चुकीचा असल्याचे प्रतिपादन ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी शनिवारी केले.
‘गोकुळ’च्या वतीने गुरुवारी (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार असून, त्याच्या नियोजनासाठी पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील दूध उत्पादक शेतकºयांची बैठक कोल्हापुरात झाली. त्यामध्ये त्यांनी परखड भूमिका मांडली. नरके म्हणाले, जगभरात गाईच्या अतिरिक्त दुधाचा प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर दबाव आणणे संयुक्तिक असताना त्याचे राजकीय भांडवल केले जाते, हे उत्पादकांच्या दृष्टीने घातक आहे.
नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आपणाला रस नसून यातून ‘गोकुळ’ला दगाफटका बसू नये. संघाच्या कारभाराबाबत काही त्रुटी असतीलही, त्या दाखवाव्यात आणि संचालकांनी त्यामध्ये सुधारणाही केल्या पाहिजेत, अशी आपली भूमिका आहे. सतेज पाटील यांना त्रुटी दाखविण्याचा आणि दरवाढ मागण्याचा हक्क आहे. त्यांनी माहिती मागितली आणि ती दिली नसेल तर त्यांनी पुढचे पाऊल उचलावे. सर्वच बाबतींत सर्वसाधारण सभेचे भांडवल करून आगपाखड करणे योग्य नाही.
दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, पावडर खरेदी करावी, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नरके यांनी केले. याप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास जाधव, डी. जी. पाटील, शामराव पाटील, अंबाजी पाटील, आबा रामा पाटील, एम. जे. पाटील, तानाजी पाटील, आदी उपस्थित होते.सगळे ‘गोकुळ’च बाद कसे?एवढा मोठा डोलारा हाताळताना काही चुका होत जातात. प्रशासन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यावरून सगळे ‘गोकुळ’च बाद असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे नरके यांनी सांगितले.साहेब, तटस्थच राहूयाबैठकीत काही संस्थाचालकांनी स्पष्ट भूमिका मांडली. साहेब, सतेज पाटील यांच्या मोर्चालाही आपण गेलो नव्हतो. मग या मोर्चासाठी कशाला आग्रह धरता, अशी विनंती संस्थाचालक करीत होते.