कोल्हापूर : देवकर पाणंद येथील रंगकमल नगरमधील कच्चा रस्ता ड्रेनेजसाठी खोदण्यात आला. मात्र, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुरूम न पसरता केवळ मातीच पसरली आहे. त्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालविणे तर दूरच, चालणेसुद्धा मुश्कील झाले आहे. रस्ता दाखवा आणि लाख रुपये मिळवा, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. देवकर पाणंद येथील राजलक्ष्मी नगर, रंगकमल नगर या नगरांमध्ये महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी रस्त्यांवरील ड्रेनेज लाईनचे काम सुरू केले होते. मात्र, हे काम संथगतीने सुरू होते. यावेळी उन्हाळा असल्याने या परिसरातील रहिवाशांना रस्त्यातून वाट काढत जाणे शक्य झाले. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मुळातच कच्चा असणारा रस्ता आणखी चिखलमय झाला. केवळ वाहनांनाच या रस्त्यावरून जाता येत होते; पण जादा पाऊस झाल्यानंतर हा रस्ताच आणखी खचला. त्यातच महापालिकेने या रस्त्यामध्ये भर टाकण्यासाठी मुरूम आणून टाकला. मात्र, तो पसरण्यात न आल्याने चालत जाणेही मुश्कील बनले आहे. रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून जाताना अगदी नदी किंवा ओढा पार केल्यासारखी येथील परिस्थिती होते. त्यामुळे या परिसरातून घरी निघालेले नागरिक घसरून पडून जखमी झाले आहेत. अशा चिखलमय रस्त्यावर आणून टाकलेला मुरूम पसरून चालण्यायोग्य तरी रस्ता बनविण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. मात्र, अद्यापही महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी या मागणीकडे लक्ष देत नसल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत.
रस्ता दाखवा; लाख रुपये मिळवा
By admin | Published: July 25, 2014 12:45 AM