कोल्हापूर : आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सामूहिक श्रमदान आंदोलन केले. त्यांनी काळ्या फिती लावून काम केले.या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, १०, २० आणि ३० वर्षांनंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले.
त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, शेंडा पार्क येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, गूळ व ऊस संशोधन केंद्र, कसबा बावडा येथील कृषी तंत्र विद्यालयातील सुमारे २५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. त्यांनी काळ्या फिती लावून आणि श्रमदान करून आंदोलन केले.