म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध्ये तरूणींसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय आहे. तर, आता लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने हे काम जलदगतीने सुरू आहे.चिकोत्रा खोऱ्यातील शेवटचे टोक असणाºया या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी या उद्देशाने काही तरूणांनी गावच्या उत्तरेकडील वनीकरण परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्धार केला आणि चार दिवसांपूर्वी चार-सहा तरूणांनी खोरे, टिकाव, कुदळ, पाट्या हातात घेऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. सार्वजनिक मोकळ्या जागेत दोन ते तीन फूट खोल आठ ते दहा फूट लांब चरींची (सीसीटी) खुदाई सुरू केली. गावातील तरूण तरूणींसह महिलाही सहभागी झाल्या. पुढीलवर्षी लिंगनूर गाव पाणीदार होईल असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला आहे.सोशल मीडियाचा असाही वापरलिंगनूर गावातील तरूणांना व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून या जलयुक्तच्या श्रमदानाबद्दल आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत ६५ हून अधिक तरुण व महिला श्रमदानासाठी पुढे आल्या. दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदान केले जात आहे. यामुळे सुमारे दोन लाख लिटर पाणी जमिनीत मुरले जाणार असून यामुळे गावातील विहीर, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.
लिंगनूरकरांचे जलयुक्तसाठी श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:57 PM