आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : सरीवर सर कोसळत असताना मध्येच सुर्याचं दर्शन व्हावं आणि त्याच्या किरणांची उब अंगावर रेंगाळत असतानाच पुन्हा पावसानं आपलं अस्तित्व सिध्द करावं. असा माहोल अनुभवण्याच्या संपन्न श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ होत आहे. विशेष म्हणजेच सोमवारचा उपास धरतच या श्रावणाचे स्वागत होणार आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये ॠतु आणि सण यांचा पूरक संबंध आहे. एकीकडे पावसाळा ऐन जोमात असताना दुसरीकडे शरीरस्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी दक्षता या श्रावण महिन्यामध्ये घ्यावी अशीच ही सर्व रचना. त्यामुळे मग आहारापासून अनेक बाबतीत पथ्ये यानिमित्ताने पाळण्याबाबत आग्रह होत असतो. त्यामुळेच मग श्रावणातील सोमवारचा उपवास महत्वाचा ठरतो. त्यामुळे बाजारपेठेतही गेले चार दिवस श्रावणाची चाहूल लागली आहे. अगदी सोमवारी शंकराला वहावयाच्या बेलापासून ते खिचडीच्या शाबुदाण्यापर्यंतच्या आवश्यक पदार्थांनीही दुकाने आणि मंडया सजल्या आहेत. हाच महिना हिंदू सणातील विविध व्रतवैकल्यांचा मानला जातो.श्रावण शुभारंभानंतर लगेचच २७ जुलै (गुरूवारी)नागपंचमी येते.
अजूनही दूधलाह्यांचा नैवेद्य दाखवून आपला भाऊ म्हणून नागरायाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. कृषिसंस्कृतीतील कृतज्ञेचाच हा एक भाग आहे. भावाबहिणीचं नातं आणखी दृढ करणारे रक्षाबंधन ७ आॅगस्टला आहे. नारळी पौर्णिमाही याच दिवशी आहे. तर १४ आॅगस्टला (सोमवार)श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. या दिवशी अनेक ठिकाणी गोकुळ उभारून कृष्णाचा पाळणा म्हटला जातो आणि सुंठवड्याचे वाटप केले जाते. २१ आॅगस्ट रोजी अमावस्या असून याच दिवशी श्रावणाची समाप्ती होते.
सोमवारी महादेव मंदिरात गर्दी
श्रावण महिन्यातील सोमवारी शहर आणि परिसरातील सर्वच महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. अनेक मंदिरांमध्ये रांग लावून शिवशंभोंचे दर्शन घेतले जाते. पिंडीवर बेल वाहण्यासाठीही मोठी गर्दी होते. वाढत्या सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा घालणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे बाजारपेठेतही उलाढाल होते.कर्दळीपासून ते पुजेच्या पुड्यापर्यंतचे साहित्य खरेदीसाठीही शनिवारी, रविवारी गर्दी होताना दिसते.
उपवास सोडण्याचे निमंत्रण
सोमवारचा उपवास सोडण्यासाठी घरी भोजनाला मामा, जावई, आप्त, नातेवाईक यांना बोलावण्याची पध्दत आहे. त्यामुळे कौटुंबिक स्नेह वृध्दींगत करण्यासाठीची एक रूढ पध्दत म्हणून आजही अनेक घरांमध्ये श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठी बोलावण्याची पध्दत आहे.
गावोगावी भजन
श्रावणामध्ये गावोगावच्या मंदिरामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन करण्याची परंपरा आजही पाळली जाते. एकीकडे दिवसभर शेतामध्ये काबाडकष्ट करूनही अनेक गावांमध्ये मंदिरांमध्ये रात्री बारा पर्यंत सामूहिक भजन म्हणत ग्रामस्थ या परंपरेची जपणूक करताना दिसत आहे