कोल्हापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वडणगे, ता. करवीर येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित यात्रा भरते. आज, बुधवारी या यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यानिमित..करवीरनगरीची दक्षिण काशी, अशी ओळख आहे. भगवान शिवपार्वतीच्या वास्तव्याने पुनीत श्री क्षेत्र वडणगे गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वडणगे गावाचा उल्लेख प्राचीन करवीर माहात्म्य ग्रंथात आहे. गावात ३० एकर क्षेत्रात शिवपार्वती तलाव विस्तारलेला आहे. संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगेत वास्तव्य केले होते. संबकेश्वराचे तळे, असा त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळतो. या तलावाशेजारी शिव व पार्वती, अशी दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी मंदिरे असणारे वडणगे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे.महाशिवरात्रीदिवशी आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने शिवपार्वतीच्या दर्शनासाठी दाखल होतात. महाशिवरात्रीसह श्रावण सोमवार, नवरात्र उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे होतात. यात्रेदिवशी पहाटे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. त्यानंतर टाळ- मृदंगाच्या गजरात देवीची पालखी काढली जाते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देवस्थान समितीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ग्रामपंचायत प्रशासन, यात्रा कमिटी व झाडवाट कुरण मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोंबड्याला पुजणारे एकमेव गावकोंबडा या पाळीव पक्ष्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वडणगे येथे कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा होते. करवीर भ्रमणासाठी शंकर- पार्वती गावात आले असताना तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला, असा उल्लेख प्राचीन ग्रंथात आहे. केवळ कोंबड्यामुळेच वडणगे गावात शिवपार्वती कायमचे वास्तव्यास राहिले, म्हणून या कोंबड्याची पूजा केली जाते.
- सुनील स. पाटील, वडणगे