कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कोल्हापूरमधील प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची शाळांमध्ये प्रत्यक्षात उपस्थिती नव्हती. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने वर्गात उपस्थिती लावली. सुरुवातीला शिक्षकांनी नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांना अभ्यासक्रमाची माहिती दिली. पीडीएफ स्वरूपातील पुस्तके ई-बालभारतीवरून कशा पद्धतीने डाऊनलोड करून घ्यायची याची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी निश्चित करून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकविले. स्वाध्यायाबाबतची सूचना शिक्षकांनी त्यांच्या वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिल्या. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या समितीने ऑनलाइन शिक्षणाबाबत शिक्षक, मुख्याध्यापकांना काही सूचना केल्या. काही शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी साधने उपलब्ध असलेले अनेक विद्यार्थी शाळेच्या गणवेशात ऑनलाइन वर्गामध्ये उपस्थित राहिले. ऑनलाइन का असेना पण शाळा सुरू होणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली.
चौकट
ऑनलाइन व्यवस्था
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. शाहूवाडी तालुक्यातील आंबासह अन्य परिसरातील चार शाळांना मंगळवारी भेट दिली. त्याठिकाणी शिक्षक उपस्थित होते, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
चौकट
शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण
ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती राहिली. जुन्या पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्यांच्या वितरणाचे काम शाळांमध्ये पहिल्या दिवशी करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील एकूण शाळा : ३०२६
विद्यार्थी : ५,७९,५७५
शिक्षक : १५,५००
फोटो (१५०६२०२१-कोल-ऑनलाइन शाळा ०१ ते ०३) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये मंगळवारी ऑनलाइन स्वरूपात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. शहरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षकांनी वर्गातून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०६२०२१-कोल-ऑनलाइन शाळा ०४) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये मंगळवारी ऑनलाइन स्वरूपात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाचा ‘श्री गणेशा’ केला. (छाया : नसीर अत्तार)