प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक उपस्थित आहेत.
आज दत्तजयंती निमित्य श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते. मंदिरात पहाटे ४.०० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी श्रीना पंचामृत अभिषेक पूजा केली.दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करणेत आली. दत्तजयंती निमित्य पालखी व दत्त मंदिर परिसर पुणे येथील शेखर शिंदे व परिवार आदी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसरात फुलांचे झुंबर, माळा आदींनी सजविला होता.कर्नाटक येथील बोरगाव, उगार, चिकोडी तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर आदी भागातून हजारो भक्त व महिला चालत येवून पहाटेच दत्त मंदिरात पोहचले होते. सायकल व दुचाकी वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविणेत आल्या होत्या. पहाटे तीन ते पाच च्या सुमारास हजारो तरुण व युवक वर्ग दुचाकी व सायकलने येवून कृष्णा नदीत स्नान करून श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दत्त दर्शन घेतले. गुरुदत्त शुगरचे माधवराव घाडगे यांनी यांनी श्री दत्त देव संस्थानला आजच्या महाप्रसादासाठी दोन लाखाची देणगी दिली. दत्तजयंती सोहळ्यात भाविकांच्यात मोठा उत्साह दिसून येत होता. दर्शनासाठी आलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय होती. पहाटे तीन पासून रात्री उशिरापर्येंत भाविकांनी गर्दी केली. येथील प्रसिध्द पेढ्यासोबत खवा, बासुंदी, आंबा बर्फी, कवठबर्फी, करदंठ आदी मिठाई भाविकांनी खरेदी केली.भजनी मंडळामुळे वातावरण भक्तीमय
ठिकठिकाणाहून वाद्यसाहित आलेल्या अनेक भजनी मंडळाने भजने सादर केली. त्याला भाविकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. भाविक भजनात सामील झाल्यामुळे येथील वातावरण भक्तिरसात न्हावून निघाले.पार्किंग फुल्ल
पार्किंगची जागा वाढवूनसुद्धा येथील पार्किंग फुल्ल झाले. दुचाकीची संख्या वाढलेने गावातील गल्लोगल्ली दुचाकी पार्क करणेत आल्या होत्या.