लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले : स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वत्र देव, देश आणि धर्मासाठीचा जागर मोठ्या प्रमाणात होता. याच काळात १९०४ साली हेरले (ता. हातकणंगले) गावच्या दक्षिण कुशीवर श्रीराममंदिराची स्थापना करण्यात आली.
रंगनाथ वामन कुलकर्णी हे अध्यात्म, तसेच धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी राममंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या एक-दोन वर्षांत गावच्या दक्षिणेला असलेल्या पंचगंगा नदीला महापूर आला. या महापुरामध्ये महाकाय अजस्त्र अशा प्रकारचा लाकडी ओंढका वाहून आला. हा ओंडका गावामध्ये आणण्यासाठी त्याकाळी १५ ते १६ बैलजोड्या लावल्या होत्या. त्यातील ओंडक्याचे तुकडे करीत त्यांचा वापर मंदिराच्या बांधकामासाठी केला. सुमारे २५०० स्के. फूट असलेला मंदिराचा गाभारा २८ बाय १५ असा आहे. मंदिरात बसवलेल्या मूर्ती राजस्थानहून मागवून कै. लक्ष्मण नाईक यांच्या घरामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर भगवंतराव कुलकर्णी यांच्या प्रेरणेने नागपंचमी दिवशी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मंदिरामध्ये चैत्र पाडव्यापासून हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, रामजन्म हे उत्सव साजरे केले जातात. सध्या मंदिराची सर्व व्यवस्था अनिल ऊर्फ बाबा कुलकर्णी हे पाहतात.
याचबरोबर बाराव्या शतकातील हेमाडपंती बांधकाम असणाऱ्या हनुमान मंदिरामध्येही राममंदिराची २०११ साली प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
१९ राममंदिर
फोटो :-हेरले येथील विसाव्या शतकाच्या प्रारंभातील राममंदिरामधील प्रभू राम,लक्ष्मण,सीता यांची मूर्ती.