कोपार्डे : जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, राजकारण याला नव्या वळणावर पोहोचविण्याबरोबरच
ग्रामीण भागाचे विकासाभिमुख नेतृत्व स्व. श्रीपतराव बोंद्रे दादांनी केले. त्यांच्या या कार्याची ओळख संपूर्ण राज्याला करून देण्यासाठी एक पथदर्शी उपक्रम येत्या दोन-तीन महिन्यांत हाती घेऊया, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या शालिनी पॅलेस शेजारील हॅप्पी होम येथे आयोजित जन्म शताब्दी कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते. सतेज पाटील, शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, अभिषेक बोंद्रे, रमा बोंद्रे यांच्या हस्ते बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सतेज पाटील म्हणाले, स्व. दादांच्या कारकिर्दीचा मी साक्षीदार नसलो, तरी आजही ग्रामीण भागात गेलो की दादांबद्दल ज्येष्ठ लोकांच्याकडून कौतुक केले जाते. शाहू शिक्षण संस्था, बाजार समितीचे विस्तारीकरण, जिल्हा बँक, रयत संघ, मराठा वसतिगृह, जिल्हा दूध संघ, नगरपालिकेत नगरसेवक ते नगराध्यक्ष, आमदार ते कृषिमंत्री असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला होता. मात्र, दादांनी काँग्रेसचे विचार कधीच सोडले नाहीत. कधीही कोणालाही त्रास न देणारे व्यक्तिमत्त्व चंद्रकांत बोंद्रे यांचा वारसा अभिषेक व रमा बोंद्रे चालवत असल्याचे गौरवोद्गार काढले. अभिषेक बोंद्रे म्हणाले, दादांनी जिल्ह्यातील कृषी, कला, क्रीडा व शिक्षण, सहकार यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी घालून दिलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकाराच्या मार्गावरूनच वाटचाल सुरू आहे. आ. जयंत आसगावकर म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याबाबत त्यांंची तळमळ होती. बाबासाहेब देवकर, कुंभीचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील, डॉ. उद्धव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, कुंभीचे संचालक ॲड. बाजीराव शेलार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मधुकर जांंभळे, सांगरूळचे सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, अरुण निंबाळकर, संभाजी नाळे उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिर व स्व. श्रीपतराव बोंद्रे यांच्या सचित्र स्मरणिकेचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.
...............
रमा बोंद्रेंचे गोकुळ संघात पुनर्वसन करा
सदाशिव शिर्के म्हणाले, गोकुळ दूध संघात चंद्रकांत दादांच्या नंतर आता रमा बोंद्रे यांचे पुनर्वसन करण्याचे मनावर घ्यावे. यावर मंत्री पाटील यांनी त्याला हसून दाद दिली.
_________________________________________________
फोटो २८ बोंद्रे
माजी कृषी राज्यमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या शालिनी पॅलेस शेजारील हॅप्पी होम येथे आयोजित जन्म शताब्दी कार्यक्रमावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रमा बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, आदी उपस्थित हाेते.