- दुर्वा दळवी
कोल्हापूर : कोरोना काळात आपल्या जवळील काही साठवलेले पैसे त्यांनी एकत्र केले अन् त्यातून त्यांनी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांसाठी मोफत नाश्ता तयार करून दिला, पण याच वेळी त्यांना दिसून आली कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयातील एक समस्या. ती म्हणजे पाण्याची समस्या. या समस्येवर त्यांनी वॉटर एटीएमचा उपाय शोधला आणि तो आता प्रत्यक्षात साकारही होत आहे. लोकवर्गणीतून पैसे उभे करून हा प्लांट तयार करण्यात आला आहे. ह्या प्लांटमधून सीपीआर रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना गरम आणि थंड पाणी इथे मिळणार आहे. 1 रुपयांत 1 लिटर पाणी येथे 24 तास मिळणार आहे. रुग्णांना उपचार घेताना गरम पाण्याची आवश्यकता असते. तसेच स्वच्छ पाणी मिळणे ही गरजेचे असते. हीच गरज कोल्हापुरच्या ह्या 'चारचौघी'नी ओळखली अन् आज प्रत्यक्षात प्लांट तयार करून समाजासाठी पाण्याची सोय करून दिली.
श्रुती चौगुले, अर्पिता राऊत, श्रेया चौगुले आणि आचाल कटारिया याच आहेत 'चारचौघी'. ज्यांनी वॉटर एटीएम तयार केले आहे. ह्या चौघी लहानपणापासूनच मैत्रिणी. आज त्या शिक्षण घेतच समाजासाठी एक खारीचा वाटा उचलत आहेत. सीपीआर रुग्णालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांच्या ह्या वॉटर एटीएमचा खूप मोठा आधार ही मिळणार आहे. आज हा प्लांट उभा करण्यासाठी लोकवर्गणीतून त्यांनी मदत घेऊन हा बहुमूल्य पाण्याचा खजिना नागरिकांच्या लोकसेवेसाठी 26 जानेवारीला खुला करण्यात येणार आहे. हा प्लांट उभा करण्यासाठी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. 2 लाख रुपयांहून अधिक खर्च त्यांनी केला आहे.
नुसतीच समाजाला मदत न करता भविष्यात ही एखाद्या उत्तम गोष्टीचा समाजाला उपयोग होईल अश्या पद्धतीने विचार करून ह्या चौघींनी हा नवा प्लांट सीपीआर येथे उभा केला आहे. आज ह्या चौघींनी शिक्षण घेतच समाजासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातीलच महत्त्वाचा हा वॉटर एटीएम प्लांट. इथे आता दररोज ह्या चौघींनी शिक्षणामुळे थांबू शकणार नाहीत. त्यामुळेच कोल्हापूरकरांनी ह्या चौघींनी तयार केलेल्या ह्या पलांटला देखभालीसाठी मदत करणे गरजेचे आहे. कोल्हापुरच्या ह्या लेकिनी उत्तम कामगिरी केली असून आता हा प्लांट सुस्थितीत ठेवण्यासाठी त्यांना गरज आहे ती कोल्हापुरकरांच्या मदतीची.