गांधीनगर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विकेंडला केलेल्या लॉकडाऊनमुळे गांधीनगर बाजारपेठेत शनिवारी शुकशुकाट होता. गांधीनगर व्यापारी पेठ पूर्णतः बंद होती. साडेतीन हजारांवर दुकानदार व तीनशे ते साडेतीनशे ट्रान्स्पोर्टधारकांनी आपली दुकाने व कार्यालये बंद ठेवली होती. गांधीनगर व्यापारी पेठेसह परिसरातील उचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड वसगडे, न्यू वाडदे या गावांतही कडकडीत लॉकडाऊन पाळला गेला. काही ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तावडे हॉटेल चौक, शिरूचौक, सिंधू मार्केट, गांधीनगर भाजीमंडई, चिंचवाड रेल्वे फाटक, गडमुडशिंगी कमान, मनेर मळा, उचगाव ब्रिज, याठिकाणी पोलिसांकडून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली. गांधीनगर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, तसेच परिसरातील दुकाने बंद होती.
फोटो : १० गांधीनगर बाजारपेठ लॉकडाऊन
ओळ- १):- लॉकडाऊनमुळे गांधीनगरमधील बाजारपेठ बंद होती. २):-गडमुडशिंगी कमानीजवळ लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.