कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन बंद करण्यात आल्याने भाविकांविना देवीची पूजाअर्चा होत असून, गाभारा रिता झाला आहे; त्यामुळे अनेकजण कळसाचे दर्शन घेऊन जात होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुधवारपासून अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. मंगळवारी देवीच्या शेजारतीनंतर मंदिराचे चारीही दरवाजे बंद झाले. एरवी पहाटे पाच वाजता मंदिर उघडल्यापासून परस्थ भाविकांची परिसरात देवीच्या पहिल्या दर्शनासाठी गर्दी सुरू होते.
काकडआरती, पहाटेचा अभिषेक, साडेआठ, साडेअकराचा अभिषेक, दुपारी साडेबाराची मुख्य आरती, शंखतीर्थ, आलंकारिक पूजा ते शेजारतीपर्यंतच्या सगळ्या विधी भाविकांच्या गर्दीत आणि ‘अंबामाता की जय’च्या गजरात पार पडतात, परिसर गर्दीने फुलून जातो.बुधवारी मंदिराचा दरवाजा उघडला, तो केवळ वार सुरू असलेल्या श्रीपूजकांसाठी. सध्या पुजारी पराग ठाणेकर यांचा वार सुरू आहे. मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवीचे नित्य धार्मिक विधी रोजच्याप्रमाणे सुरू आहेत. त्यामुळे काकडआरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सगळे विधी श्रीपूजकांकडून करण्यात आले.
देवस्थान समितीचे मोजके कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि सफाई कामगार एवढ्या मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हे विधी पार पाडण्यात आले. अनेक भाविक सुरक्षारक्षकांना ‘दर्शनासाठी आत सोडता का?’ अशी विचारणा करीत होते. त्यांनी नकार दिल्यावर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन ते माघारी फिरत होते. आता गर्दी नसल्याने मंदिराच्या अंतर्गत दगडी बांधकामाची स्वच्छता करण्यात येत आहे.