आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0१ : कोल्हापूरात शेती उत्पन्न बाजार समिती परिसरात गुरुवारी शेतकरी संपामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली. यामुळे या परिसरात दुपारपर्र्यत शुकशुकाट होता. संपाच्या पहिल्याच दिवशी नेहमी गजबजलेल्या या बाजार समितीमधील हमालांना विश्रांती मिळाली. त्यांनी आपला वेळ मोबाईलमध्ये व्यतीत करणे पसंद केले.
शेतकऱ्यांच्या बंदमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. शुक्रवारी सुटी असल्यामुळे शनिवारपासून मालाच्या आवकेवर प्रत्यक्ष फरक दिसून येणार आहे. बाजार समितीमध्ये स्थानिक भाजीपाल्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक असते. भाजी मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदीदार माल उचलतात. एकूण माल आवकेच्या तुलनेत ३० ते ४० टक्के माल स्थानिक व्यापारी खरेदी करतात. उर्वरित माल कोकण, गोव्याला पाठविला जातो; पण गुरुवारी संपाच्या पहिल्याच दिवशी मार्केटमधील आवक कमी झाली आहे.
नियमित आवकेपेक्षा किमान ४० टक्के मालाची आवक कमी झाली आहे. भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवर समितीला १ टक्का कर मिळतो. परंतु उलाढालच कमी झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नातही घट होणार आहे. त्याशिवाय समितीत येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारला जातो. त्यातून मिळणाऱ्या महसूलही बुडणार आहे.