कणकवली: पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात शेतकर्यांसाठी कृषी विभागाचे कार्यालय महत्वपूर्ण आहे. मात्र, कृषी विभागाचे तालुका अधिकारी पंचायत समिती सभेला उपस्थित राहत नाहीत. आपला प्रतिनिधी फक्त सभेला पाठवत असतील त्याचप्रमाणे कार्यालयात गेलेल्या लोकप्रतिनिधी व शेतकर्यांना ताटकाळत ठेवत असतील तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे असे कार्यालय असण्यापेक्षा नसलेलेच बरे. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कणकवलीतील तालुका कृषी विभागाचे कार्यालयच बंद करा, अशी मागणी सदस्य मंगेश सावंत यांनी केली.तर महावितरणच्या कारभारावरही अशाच शब्दात अनेक सदस्यांनी ताशेरे ओढले. तसेच या खात्यांच्या बेशिस्त कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे सभागृहात सांगितले. त्यांचा हा कारभार कुठल्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही. असा इशाराही दिला. कृषी विभाग, महावितरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात याव्यात अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. त्यामुळे सभापती दिलीप तळेकर यांनी संबधित विभागांच्या बैठका लवकरच घेण्यात येतील असे यावेळी सांगितले.त्यामुळे संतप्त झालेले सदस्य काहीसे शांत झाले.कणकवली पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती दिलीप तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले उपस्थित होते.या सभेमध्ये वीज महावितरणच्या कारभारावर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला . पंचायत समितीच्या प्रत्येक सभेला नवीन अधिकारी पाठवून त्यांच्याकडून टोलवाटोलवी केली जात आहे, असे प्रकाश पारकर यांनी सांगितले. विजेचे अनेक खांब गँजलेले असून वीज वाहिन्या तुटण्याचा धोका आहे. त्यामुळे जिवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी महावितरणच जबाबदार असेल, असे त्यांनी सांगितले.
फोंडाघाट विभागातीलही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे माजी सभापती सुजाता हळदिवे यांनी सांगितले. तर गणेश तांबे यांनी उदाहरणासह महावितरणचा भोंगळ कारभार सभागृहा पुढे आणला. त्यामुळे या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असे सभापती दिलीप तळेकर यांनी सांगितले.पंचायत समितीच्या शेष निधीच्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकास या सभेत मंजूरी देण्यात आली. कोरोना व्हायरस, त्याची लक्षणे व प्रतिबंधात्मक, उपचार याविषयी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली.ग्रामीण पाणी पुरवठा विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन योजना गाव कृती आराखड्याची माहिती उपअभियंता किरण घुरसाळे यांनी दिली. पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केव्हा होणार आहे? उद्घाटनाची तारीख पुढे पुढे जात आहे, कामाची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा सदस्य प्रकाश पारकर यांनी केली.
इमारतीचे विद्युतीकरण करण्याचे अंदाजपत्रक कोकण आयुक्त स्तरावर केले असून लवकरच त्याला मंजूरी मिळणार आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या १५ दिवसात विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल, असे बांधकाम विभागाचे उपअभियंता सुतार यांनी सांगितले.कुर्ली घोणसरी धरण व गेटची दुरूस्ती करण्यासाठी कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. या पाण्यावर फोंडाघाट, आचिर्णे, लोरे, घोणसरी आदी गावांच्या नळयोजना कार्यरत आहेत. नळयोजना बंद केल्यास या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे.
त्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाने स्वतंत्र उपाययोजना करावी, तसे न करता पाणीपुरवठा बंद केल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील. अशी वेळ येण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा आणि नंतरच पाणी सोडा अशी मागणी माजी सभापती सुजाता हळदिवे यांनी केली. या विषयावरही संबंधितांची बैठक घेतली जाईल असे सभापती तळेकर यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीसमोरील गाळे हटविणे, झाडे तोडणे आदी कामे तातडीने करून घ्या. कळसुली, शिरवल व हळवल या गावातील नागरिकांनी अवजड डंपरची वाहतूक धोकादायक बनली असून ती थांबविण्याच्या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी उपोषण केले होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्याने या भागातील क्रशर व डंपर वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी केली.लोरे ग्रामपंचायत नंबर १ ने घरपट्टी, पाणीपट्टी साठी पासबुक तयार केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला कारभार करणे सोपे होत आहे. त्याबाबत ग्रामपंचायतीचे कौतुक प्रकाश पारकर यांनी केले. तसेच अशी व्यवस्था इतर ग्रामपंचायतींनीही करावी . असे त्यांनी या सभेत सुचविले. याशिवाय विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली.जिल्हा बँकेच्या अभिनंदनाचा ठराव !सभेच्या सुरूवातीला पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या ' पंचायत समिती आपल्या दारी ' हा उपक्रम व ' तानाजी ' चित्रपट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पहावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी राबविलेल्या उपक्रमाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
करंजे गावच्या ग्रामसेविका वर्षा जाधव यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव मेस्त्री यांनी मांडला. तर कासार्डे-साटमवाडी येथील ओहोळावर २ कोटी १० लाखाचा पूल मंजूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रकाश पारकर यांनी मांडला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार प्राप्त झाल्याने अध्यक्ष व संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव गणेश तांबे यांनी मांडला. त्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.