कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन प्रभागात सर्वाधिक ८८.५५ टक्के मतदान, तर ताराबाई पार्क प्रभागात नेहमीप्रमाणे सर्वांत कमी ५५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी व आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी रात्री पत्रकारांना दिली. मतदानामध्ये एकही बोगस मतदानाची व मतदार यादीवरील हरकतीची तक्रार आलेली नाही. एकूणच प्रक्रिया शांततेत पार पडल्याचा दावा आयुक्तांनी केला. आयुक्त म्हणाले, शाहू कॉलेज प्रभागात (क्रमांक १०) मतदार अखेरच्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्याने सायंकाळी साडेसातपर्यंत तिथे मतदान सुरू राहिले. दोन मतदान केंद्रांतील अंतर दोन किमीपेक्षा जास्त असू नये, असा निवडणूक आयोगाचा आदेश आहे. त्यानुसार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदान केंद्रे लांब असल्यामुळे मतदानास विलंब झाला, असे म्हणता येत नाही. जुने पुढे... शिकलेले मागे... जुन्या कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन प्रभाग व शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान (८५.३० टक्के) या दोन प्रभागांत शहरातील सर्वाधिक मतदान झाले; तर ताराबाई पार्क व नागाळा पार्क प्रभागात सर्वांत कमी (५६.०९ टक्के) मतदान झाले. सिद्धाळा गार्डन हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित प्रभाग आहे. तिथे पंचरंगी लढत होत आहे. जवळच मतदान केंद्र व निवडणुकीत कोणताही तणाव नसल्याने तिथे सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. पद्माराजे गार्डन प्रभाग हा खुला असल्याने तिथे शहरातील सर्वाधिक चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे तिथे मतदारांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा लावल्याने जास्त मतदान झाले. याउलट ताराबाई पार्क, नागाळा पार्क हा सुशिक्षित भाग असल्याने तिथे उमेदवारांना यंत्रणा लावून मतदारांना बाहेर काढण्यावर मर्यादा येतात. त्यातही ‘आम्ही मतदान नाही केले तर त्यामुळे काय बिघडणार आहे?’ अशी मानसिकताही उच्चभ्रू लोकांची असते. पैशाच्या, चिखलफेकीबद्दलही त्यांच्या मनांत घृणा असते त्यामुळे तो मतदानासाठी बाहेर पडत नाही.
‘सिद्धाळा गार्डन’मध्ये सर्वाधिक ८९ टक्के मतदान
By admin | Published: November 02, 2015 1:10 AM